Breaking News
पाणथळ क्षेत्र, तलाव वाचविण्यासाठी जनचळवळ
नवी मुंबई ः ठाणे खाडीच्या क्षेत्रामधील नवी मुंबई, उरण परिसरातील पाणथळ क्षेत्रांनी जवळपास 194 हेक्टर भुभाग व्यापला आहे. यामधील टीएस चाणक्य व एनआरआय पाणथळ परिसरामध्ये खारफुटी तोडून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. यामुळे फ्लेमींगोसह 167 पक्षांचा व शेकडो समुद्री जीवांचा आदिवास धोक्यात आला आहे. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या वृक्षतोडीविरोधात जनआंदोलन सुरू केले आहे. तसचे तलाव बुजवून इमारती उभारण्याचा प्रकार सुरु आहे. याविरोधात प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे.
शासनाने ठाणे खाडी परिसरामध्ये फ्लेमींगो अभयारण्य घोषीत केले आहे. ऐरोली ते बेलापूर व उरण परिसरातील खाडीकिनारा पर्यावरणासाठी महत्वाचा आहे. या विभागात टी. एस. चाणक्य, एनआरआय, पाणजे, बेलपाडा ही चार पाणथळ क्षेत्र आहेत. खाडीकिनाऱ्यावरील ही जैवविविधता टिकविण्यासाठी खारफुटीच्या जंगलाचे रक्षण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली व समाज कंटकांकडून खारफुटीचे नुकसान केले जात आहे. टी एस. चाणक्य खाडी किनारी हजारो फ्लेमिंगोंचा दरवर्षी अधिवास पाहायला मिळतो. परंतु याच ठिकाणी सातत्याने छुप्या पध्दतीने कांदळवन नष्ट करण्याचा प्रकार केला जात आहे. मे 2023 ला ठाणे खाडीला विशेष संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे. परंतु चाणक्य तलावाच्या देखभाल व सुरक्षेकडे सिडकोने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. खासगी बिल्डरच्या सुरक्षा कर्मचार्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली असून चाणक्य तलाव हॉटेल आणि निवासी टॉवर्सच्या बांधकामासाठी विकण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. चाणक्य तलावा बाजूकडील 125 हून अधिक निरोगी, पूर्ण वाढलेली खारफुटीची झाडे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी निर्दयीपणे तोडली आहेत.या विरोधात स्थानिक व पर्यावरणप्रेमींमध्ये संताप असून हा तलाव बुजवण्यासाठीचा घाट घातला असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला त्या विरोधात रविवारी आंदोलन केले जात आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शहरातील पर्यावरण प्रेमी एकवटले असून त्यांनी वृक्षतोडीविरोधात लढा सुरू केला आहे. पर्यावरण प्रेमी नागरिक प्रत्येक रविवारी टी.एस.चाणक्य परिसरात एकत्र येत असून शांततेच्या मार्गाने वृक्षतोडीच्या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, पाणथळ क्षेत्राचे रक्षण करावे, जैवविविधता टिकविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे. या आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. प्रत्येक रविवारी निषेध नोंदविण्यासाठी येणारांची संख्या वाढत आहे. या आंदोलनाला जनचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असून यासाठी देशभरातील पर्यावरण प्रेमींचा पाठिंबा मिळविण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai