Breaking News
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाल्यानंतर सांगलीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज (31 जानेवारी) त्यांची प्राणज्योत मालवली. निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आमदार बाबर यांच्या कुटुबीयांचे सांत्वन केले. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने विटा खानापूर-आटपाडी मतदार संघावर शोककळा पसरली आहे. हजारोंच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
रुग्णालयातून आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव विटामधील घरी आणण्यात आले. त्यानंतर विटा शहरातून गार्डीकडे अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेनंतर बाबर यांच्या पार्थिवावर गार्डी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गार्डीमध्ये जीवन प्रबोधिनीच्या मैदानावर बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार विश्वजित कदम अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल बाबर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai