मानसिक आधारासाठी पालिकेचे ‘कॉल सेंटर’

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराबरोबरच मानसिक आधार देणे महत्वाचे आहे. मात्र काही ठिकाणी रुग्णांशी नातेवाईक दुरावत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे पालिका त्यांना उपचाराबरोबर ‘कॉल सेंटर’च्या माध्यमातून मानसिक आधारही देत आहे. दररोज सात हजार नागरिकांशी या माध्यमातून संपर्क केला जात आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तही त्यांच्याशी संवाद साधत आहेत.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून हे कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 50 जणांना प्रशिक्षण देत या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रातून दररोज घरीच अलगीकरणात असलेले, पालिकेच्या काळजी केंद्रात उपचार घेत असलेले, उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्यांसह शहरातील इतर आजार असलेल्या रुग्णांशी संपर्क करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्याबरोबर आरोग्यविषयक इतर मदत हवी असल्यास ती तातडीने उपलब्ध करून दिली जात आहे. यात पालिका आयुक्तही अधूनमधून संवाद साधत असल्याने या काळात एकटेपणाची भावना दूर होण्यास मदत होत असल्याची प्रतिक्रिया रुग्ण देत आहेत. या केंद्रातून घरीच विलगीकरणात असलेल्या 1 हजारांहून अधिक जणांना दिवसातून दोन वेळा संपर्क केला जात आहे. त्यांच्या शरीराचे तापमान, प्राणवायू पातळीची विचारण केली जात असून गरज भासल्यास त्यांना उपचार केंद्रात हलविले जात आहे.

वैद्यकीय मार्गदर्शन

कोरोनाबाधितांसह मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी अथवा हृदयविकार असलेल्या रुग्णांची या काळात गैरसोय झाली आहे. अशा 1500 जणांना दिवसातून एक वेळा संपर्क केला जात आहे. त्यांना डॉक्टरांचे मार्गदर्शन हवे असल्यास पालिकेने यासाठी नियुक्त केलेल्या पाच डॉक्टरांशी त्यांना जोडून दिले जात आहे. त्यामुळे घरात बसून या परिस्थितीत उपचार घेणे त्यांना शक्य होत आहे.