सिक्कीमची विकासाकडे झेप
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 59
राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांचा नवी मुंबईतील पत्रकारांशी संवाद
नवी मुंबई : भारताचे पूर्वोत्तरद्वार असलेल्या आणि नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या सिक्किम राज्याने आता सर्व संकटांवर मात करुन विकासाकडे झेप घेतली आहे. सिक्किम राज्याने नुकताच आपला 50 वा वर्धापन दिन साजरा केला. याचे औचित्य साधून नवी मु्ंबई प्रेस क्लबच्या सदस्यांनी सिक्किम दौऱ्यादरम्यान राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांची सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला. या निमित्ताने सिक्कीमवरील नैसर्गिक आपत्तीनंतर राज्य सरकारने त्यावर कशी मात केली, याची माहिती देतानाच सिक्कीमच्या भविष्यातील शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, सामाजिक विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली.
राज्याचे नैसर्गिकसौंदर्य, बर्फाच्छादीत कंचनजंगा सारखी हिमशिखरे यामुळे सिक्कीम सरकारने आता नानाविध विकास प्रकल्प, रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हीटीवर भर दिला आहे. याशिवाय भारतीय जवानांचे शौर्याचे प्रतिक असलेल्या नाथुला पास, झिरो पॉईंट आदी ठिकाणांच्या विकासावर भर दिला जात आहे. यामुळे राज्यात पर्यटनवृद्धीला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान, गंगटोक येथील राजभवनात राज्यपालांनी पत्रकारांचे स्वागत केले आणि सिक्कीमचा विकास, पर्यटन, जैवविविधता संवर्धन आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांवर सविस्तर चर्चा केली.
पत्रकारांनी सिक्कीमच्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि व्हायब्रंट व्हिलेज यासारख्या विषयांवर राज्यपालांशी सखोल चर्चा केली. राज्यपाल म्हणाले की सिक्कीम हे केवळ नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक नाही तर शिस्तबद्ध वाहतूक, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचे जिवंत उदाहरण आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत होम स्टेचे महत्त्वपूर्ण योगदान असून पर्यटकांनी तेथील आदरातिथ्याचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भारतातील पहिले सेंद्रीय शेती असलेले राज्य, प्लास्टिकमुक्त असलेले एकमेव राज्य, स्वच्छ भारत अभियानात पहिले येणारे राज्य, वाहतूक शिस्त असलेली जनता आणि महिलांचे सर्वच क्षेत्रात असलेले योगदान यामुळे सिक्किमचे दरडोई उत्पन्न सात लाख रुपये असल्याचा राज्यपाल माथूर यांनी अभिमानाने उल्लेख केला. यावेळी राज्यपालांसोबत त्यांचे ओएसडी रतीश चतुर्वेदी, राजभवनाच्या जनसंपर्क अधिकारी ममता अवस्थी उपस्थित होते. तर नवी मुंबई प्रेस क्लबच्या शिष्टमंडळात पत्रकार मनोज जालनावाला, नारायण जाधव, कमलाकर कांबळे, जॉर्ज मेंडोन्सा, विक्रम गायकवाड, नंदकुमार ठाकूर, मच्छिंद्र पाटील, भिमराव गांधले, वसंत चव्हाण आणि मफतलाल चव्हाण यांचा समावेश होता.
- नाथुलाचा भीमपराक्रम प्रकाशात आणणार
1967 च्या भारत-चीन युद्धाचा इतिहास आणि मेजर जनरल सगत सिंग यांचे योगदानावर राज्यपाल नवी मुंबईतील पत्रकारांशी भरभरून बोलत होते. यामुळेच गत वर्षापासून 11 सप्टेंबर हा दिवस नथुला विजय दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जात असल्याचे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर लोंगावाला युद्धाप्रमाणे नाथुला-डोकलामचा पराक्रम संपूर्ण भारतीयांना अवगत करून देण्यासाठी बॉर्डर सिनेमा प्रमाणे नाथुला युद्ध पराक्रमावर सिनेमा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai