Breaking News
गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसला अध्यक्ष नसल्याने पक्षातल्या जी-23 गटाने अध्यक्ष निवडीचा आग्रह धरला आहे. त्यातच बंडखोरांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेसने अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.मात्र अध्यक्ष निवडीवरून काँग्रेस मध्ये सुरू असलेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज नेते निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवा वाद निर्माण करत आहेत. निवडणूक कार्यक्रमाला अंतिम रूप देण्यासाठी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यावर जोरदार वाद झाला. पक्षाचे असंतुष्ट नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. आझाद यांनी पक्ष सोडताना सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पाच पानी पत्रात शर्मा आता जसे प्रश्न उपस्थित करत आहेत, तेच प्रश्न उपस्थित केले होते. रसातळाला जाण्याची वेळ काँग्रेसवर आली असली तरी त्यातून धडा घेण्याची बुद्धी या नेत्यांना होत नाही किंवा हे नेते जाणीवपूर्वक हि भूमिका घेत असल्याची शंका घेण्यास वाव आहे.
सध्या काँग्रेसची कमान पक्षातील माध्यम विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश सांभाळत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरोखरच निवडणूक होणार का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांनीच अध्यक्ष व्हावं, असा काँग्रेसजनांचा आग्रह आहे. शशी थरूर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे; परंतु राहुल निवडणूक लढवणार नसतील तर गांधी परिवार त्यांच्या विश्वासातले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवू शकतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी या चार पिढ्यांशी त्यांचे संबंध आहेत आणि काँग्रेसमध्ये मास बेस’ असलेला एकमेव नेता अशी त्यांची ओळख आहे. पक्षातील जेष्टांच्या लुडबुडीमुळे राहुल गांधी हे निवडणूक लढाऊ इच्छित नाहीत.काँग्रेस पक्षाने अध्यक्ष निवडून येणार्या निवडणुकीत सामोरे जाऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हमे तो अपनोने मारा औरोमे काही दम था अशी अवस्था सध्या काँग्रेसची आहे.
गेल्या निवडणुकीप्रमाणे पक्ष राहुल गांधींना अध्यक्ष करण्याच्या बाजूने असला तरी त्यांनी उमेदवारीसाठी स्पष्ट नकार दिला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. पक्ष वाचवण्यासाठी आता पावलं उचलावी लागतील, असं त्यांनी म्हटलं. एखाद्याला कठपुतली अध्यक्ष’ करून बॅकसीट ड्रायव्हिंग करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस टिकू शकणार नाही, असं चव्हाण म्हणाले. राहुल यांना अध्यक्ष व्हायचं नसेल तर पर्यायी व्यवस्था करून काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला पाहिजे. राहुल यांच्या कार्यशैलीवर जाणीवपूर्वक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश वर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आधी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या कपिल सिब्बल, अश्वनीकुमार, ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह आणि सुनील जाखड या नेत्यांनि असेच आरोप केले. काँग्रेस हा आता घराण्याचा पक्ष झाल्याचा साक्षात्कार या प्रौढांना गेली चाळीस वर्ष सत्ता उपभोगून अर्धी लाकडे मसनात गेल्यावर झाला आहे. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जुन्या काँग्रेसजनांना हाकलून देण्यास सुरुवात केल्याचे आरोप राहुल यांच्यावर करत आहेत. पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर अध्यक्षपदाच्या निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पडल्या पाहिजेत असं या थोरांचा म्हणणं आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधी पक्षातील ज्येष्ठांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्षात येऊ घातलेल्या नवं नेतृत्वावर अन्याय होत असल्याची भूमिका काँग्रेसमध्ये आहे. भाजपने ज्येष्ठांना अगोदरच मार्गदर्शक मंडळात पाठवून आवश्यक निर्णय कसे घ्यायला हवेत याचा परिपाठ काँग्रेसपुढे घालून दिलेला असताना सोनिया गांधी विनाकारण ज्येष्ठांना कवटाळून बसले आहेत. गेली अनेक वर्ष ज्येष्ठांनी केलेला त्यांच्या कारभारामुळे ते सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आहेत. असे नेते कोणतीच भूमिका सरकारच्या विरोधात घेणार नाहीत आणि जे घेतील विरोधात त्यांना विरोध करतील. त्यामुळे जोपर्यंत या भ्रष्ट नेत्यांना गांधी परिवार पक्षातून दूर करत नाही व पक्षांमध्ये तरुण नेतृत्व पुढे आणून पक्षात नवे चैतन्य निर्माण करत नाही तोपर्यंत काँग्रेसला यश मिळणार नाही हे निश्चित. सुदैवाने जरी यश आले तरी ईडी व सीबीआयच्या धाकाने निवडून आलेले पुन्हा स्वतःला विकण्यास मोकळे राहतील. काँग्रेस पक्षाला संजीवनी फक्त गांधी परिवाराकडून मिळू शकते याची जाण मोदी-शहा याना असून त्यांनी जाणीवपूर्वक राहुल गांधी यांना सुरुवातीपासून लक्ष केले. राहुल गांधी राजकारणात आता जम बसवत असल्याचे दिसताच काँग्रेस पक्षातील नेत्यांनीच त्यांना लक्ष केले आहे. हा काही योगायोग नाही तर हे कोणाच्यातरी इशार्यावर जाणीवपूर्वक केले जात आहे. भाजपासह संपूर्ण विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना काँग्रेस मात्र पक्षांतर्गत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यस्त आहे. किती हा विरोधाभास. काही महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जाते. केजरीवाल यांनी भाजपला त्यांच्याच होमपिचवर पराजित करण्यासाठी गेले चार महिने प्रचाराची धुळ उडवली आहे. काँग्रेस मात्र या लढाईत कूठेच दिसत नाही. आजही काँग्रेस पक्षाला सुमारे 18 टक्के मतांचा जनाधार संपूर्ण देशात आहे. त्यामुळे त्यांनी विरोधकांना सोबत घेउन व्यवस्थित मोट बांधली तर घोडा मैदान दूर नाही. 2024 ला विरोधकांना सत्ता मिळवता आली नाही तर मात्र भविष्यातील होणार्या निवडणुका नाममात्र असतील व ती देशातील अघोषित हुकूमशाहीची सुरुवात असेल. त्यामुळे विरोधकांसाठी हि शेवटची संधी आहे...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे