Breaking News
आज समाजामध्ये दोन मुद्दे अत्यंत प्राधान्याचे आहेत. एक महिलांची सुरक्षा व दुसरे म्हणजे महिलांचे आरोग्य. दररोज देशामध्ये महिलांवर होणार्या अत्याचाराची आकडेवारी जर पाहिली तर ती अत्यंत धक्कादायक आहे. अगदी चिमुकल्या मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत अत्याचाराच्या बळी पडण्याच्या घटना पहिल्या की मन सुन्न होते. एकविसाव्या शतकात देखील महिलांना पुरुषी अहंकाराचे भक्ष्य व्हावे लागत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. यासाठी महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आज गरज आहे. महिला अत्याचाराबरोबरच महिलांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील तितकाच जटिल व संवेदनशील असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महिला सक्षमीकरणातील पहिले पाऊल महिला आरोग्य हे आहे. यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर महिलांच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घेणे फार महत्वाचे आहे. तसे पाहायला गेले तर आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला प्रगतीपथावर आहेत. क्रिडा, सांस्कृतिक, प्रशासकीय, आरोग्य, बँकींग इतकेच काय सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्येदेखील महिला सर्वच पातळयांवर आघाडीवर दिसून येत आहेत. आपल्या देशातील कायदे व संविधानिक नियम महिलांना काही प्रमाणात सौम्यतेचे असले तरी महिलांची सुरक्षा व त्यांचे आरोग्य या बाबी आजदेखील चिंतेचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तोकडया सुविधांमुळे आजही महिलांना अनेक सामाजिक अपप्रवृत्तींचा सामना करावा लागत आहे. शासनामार्फत सुरक्षा उपाययोजना अंमलात आणण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करण्यात येत असला तरी समाजाची स्त्रीयांप्रती असलेली दुषित मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य प्रश्न आहे तो महिलांच्या आरोग्याचा. शहरी भागामध्ये, कुटुंबातील सर्व घटकांना स्वतापेक्षा अधिक प्राधान्य देण्याच्या वृत्तीमुळे तसेच तंत्रज्ञानाच्या युगात जगण्याच्या धडपडीतुन बहुतांश स्त्रिया स्वतःचे आरोग्य, पोषण, पुरेशी विश्रांती या बाबतीत दुर्लक्ष करतात व त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतात. आज सुशिक्षित कुटुंबातील बहुतांशी नोकरी- व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाच्या आहार-पोषण व आरोग्याची जबाबदारीदेखील घरातील स्त्री पार पाडत असते. यामधुन तीचे आपल्या स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कामाच्या निमित्ताने होत असलेला अत्यंत तापदायक प्रवास व दगदगीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी स्त्रियांमध्ये येत असल्याचे आपल्याला घरोघरी जाणवेल. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आरोग्याच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे. नोकरी, बाळंतपण, मासिक पाळी, कुपोषण, कौटुंबिक व्याप या सर्वच पातळीवर स्त्रीला परीक्षेला सामोरे जावे लागते. या सर्व कष्ट चक्रानंतरदेखील स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने आज उभे राहावे लागते. कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी आपली कर्तबगारी सिद्ध करावी लागते. कामाच्या ठिकाणी सर्व जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडून घरीदेखील तितक्याच क्षमतेने तिला गृहकाम करावे लागते. घरातील पुरुष, वृध्द व मुलांच्या संगोपनाची जबाबदारी गृहिणीकडे असते. त्यांना घरगुती कामांसाठी संपूर्ण दिवस अपुरा पडतो. या सर्वांचा परिणाम तिच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे स्त्रीने इतर सर्व व्यापांबरोबर स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत दक्ष राहणे काळाची गरज आहे. योग्य आहार, प्रतिबंधात्मक चाचण्या, तपासण्या, औषधें, उपचार, आराम, पुरेशी झोप या बाबतीत योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. गरोदरपणाच्या काळात स्त्रीला सर्वात मोठी व महत्वाची जबाबदारी पेलावी लागते. स्वताबरोबरच गर्भातील जीवाची निगा तीला तब्बल 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ राखावी लागते. प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात मुलाच्या संगोपनामध्ये स्त्रीला अनेक दिव्यांतुन जावे लागते. या सर्व जबाबदारीतुन तीला स्वतःचे जीवन निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी दैनंदिन जिवनात तारेवरची कसरत करावी लागते. शासकीय पातळीवर आज अनेक योजना, स्त्री आरोग्य शिक्षणाच्या माध्यमांतून स्त्रीयांना आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन व सहायय देण्यात येत आहे. नागरी भागांमध्ये शासकीय आरोग्य संस्थांमध्ये तर ग्रामीण भागात आशा कार्यकरतींमार्फत महिलांच्या आरोग्याविषयी माहिती प्राप्त करून घेता येऊ शकते जेणेकरून उद्भवणारे आजार वेळीच थोपवता येतील. अन्यथा आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास त्यातील क्लिष्टता व खर्चदेखील वाढत जातो. स्त्रीचे निरोगी आयुष्य हाच सुखी कुटुंबाचा गाभा आहे. स्त्री निरोगी तर परिवार निरोगी व आनंदी राहील.
स्त्रीचे महत्व अनादीकाळापासून अधोरेखित आहे. कधी मुलगी, कधी बहीण, कधी आई, कधी पत्नी, कधी वहिनी, काकी, आजी, पणजी अशा एक ना अनेक रुपामध्ये आपणास ती भेटते. स्त्री हा कुटूंबातील अत्यंत महत्वाचा घटक व संसाररूपी रथाचे दुसरे चाक. ज्याविना पुरुषच नाही, समाज नाही अक्खे विश्व स्वतःला अपूर्णतेची जाणीव करून घेते अशी स्त्री. आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया प्रगतिशील असून मोठमोठ्या स्थानांवर-पदांवर विराजमान आहेत. खरेतर स्त्री पुरुष समानतेचा व महिला शक्तीचा जागर सर्वत्र होणे हि बाब जागतिक लोकतंत्राला भूषणावह ठरेल. आज स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समानता, स्त्री सुरक्षितता, सक्षमीकरण, शिक्षण व महत्वाचे म्हणजे स्त्री आरोग्याच्या बाबतीत असणारी उदासीनता झटकलेली आहे का हि बाब तपासणे गरजेचे आहे. आज जरी स्त्री सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पावले टाकत असली तरी अशा स्रीयांची टक्केवारी अधिक नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. देशातील अनेक भागात स्त्रीला आजदेखील उपेक्षित व केवळ गरजेची वस्तू समजली जाते हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शिक्षण, करिअर, आरोग्य या सर्वच क्षेत्रात महिला ज्या समाजात अग्रेसर असतात तो समाज नेहमीच सन्मानाने नांदत असतो व पुढारलेला असतो. शासनाच्या माध्यमातुन आज महिला सक्षमीकरणासाठी व महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांना समान आरक्षणाबरोबरच त्यांना विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविण्याच्या उद्देशाने संधी उपलब्ध होत आहेत. महिलांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या देशामध्ये होताना दिसत आहेत ही खुप समाधानाची बाब आहे व याची दखल जागतिक स्तरावरदेखील वेळोवेळी घेतली गेली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे महिलांचे शिक्षण. एक महिला शिकली तर अख्खे कुटूंब शिकते व अशी अनेक कुटुंबे शिकली तर समाज सुशिक्षित म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात महिलांचे महत्व अधोरेखित करायचे असेल, महिलांच्या दुबळेपणाचा शिक्का पुसून टाकायचा असेल तर महिलांना उच्च व कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे. जेणेकरुन् महिला कोणत्याही आधाराविना समाजात निर्भयपणे उभ्या राहू शकतील व स्वताबरोबरच समाजाचा उत्कर्षदेखील साधु शकतील. स्त्री शिक्षणाचा पाया ज्या फूले दांपत्यांने रचला त्यांचा उद्देश केवळ स्त्री जातीलाच संपन्न करणे नव्हता तर समाजालाही विकासाच्या वाटेवर नेवून ठेवण्याचा होता. आज सर्व माध्यमांतुन यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. सामाजाच्या व देशाच्या विकासासाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे स्त्री सशक्तीकरणाचा विचार करुनच उचलले गेले तर चांगला परिणाम दिसुन येईल. यासाठी आपली मानसिकता स्त्री सशक्ततेमध्ये परावर्तीत केली गेली पाहिजे. पुरुष प्रधान संस्कृतीचा पुरस्कार करणा़-या आपल्या समाजाची मानसकिता बदलवणे आवश्यक असुन स्त्री सक्षमीकरणामधील आजची प्रगती पाहता लवकरच या दिशेने मैलाचा दगड आपण गाठू अशी आशा करण्यास हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai