Breaking News
दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील.
राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यात निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता याबाबतचं अधिकृत पत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai