Breaking News
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचेजे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक 14 जून 2021 पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिनांक 14 मे 2021 रोजी यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ’ब्रेक द चेन’ प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. राज्यात गेल्या 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. 15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरु आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai