Breaking News
मुंबई : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग 100 टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
2021 च्या निकालामध्ये केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्याच मोठ्या प्रमाणात वाढली नाही तर टॉप करणार्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यावर्षी 957 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण म्हणजे 100% गुण मिळाले आहे. महाराष्ट्र बोर्डाने मागील 6 वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली होती. गेल्या वर्षी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.30 टक्के होती. यंदा ही टक्केवारी 99.95 टक्के आहे.
कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना 23 जूनपासून 9 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.
नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर 15 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai