Breaking News
मुंबई ः कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध 25 जिल्ह्यांसाठी शिथील करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (29 जुलै) कोव्हिड टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.
टोपे यांनी म्हटलं, कोरोना रुग्णांची राज्याची जी सरासरी आहे, त्यापेक्षा कमी सरासरी असणार्या 25 जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे शिथील करण्याचं निश्चित झालेलं आहे. राज्यातील लेव्हल तीनच्या निर्बंधात वीकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार- रविवार बंद होता. त्याऐवजी शनिवारी 4 वाजेपर्यंत सुरू, फक्त रविवारी बंद, असा पर्याय समोर आला आहे. शॉप, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्याऐवजी ते 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्याची सकारात्मक चर्चा झाली आहे. बाकीच्या 11 जिल्ह्यांना लेव्हल-3 मध्येच ठेवण्यात येईल. यात पश्चिम महाराष्ट्रातील 5, कोकणातील 4, मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर हे 11 जिल्हे असतील.
महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर हे 4 जिल्हे, पश्चिम मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर अशा एकूण 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहे. महाराष्ट्रात सध्या लागू असलेले लॉकडाऊनचे निर्बंध 31 जुलै रोजी संपणार आहेत. राज्यात सध्या विकेंड लॉकडाऊन लागू असून सोमवार ते शुक्रवारपर्यंत केवळ दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आहे. या वेळेत वाढ करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai