Breaking News
मुंबई ः देशातल्या पेट्रोलियम मार्केटिंग व्यवसायात सहा नवीन खासगी कंपन्या येऊ शकतात. या कंपन्यांमध्ये निकोप स्पर्धा झाल्यास ग्राहकांचा फायदा होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांना सरकारकडून लवकरच पेट्रोल आणि डिझेल विकण्याची परवानगी मिळू शकते. आयएमसी, ऑनसाइट एनर्जी, आसाम गॅस कंपनी, एमके ऍग्रोटेक, आरबीएमएल सोल्युशन्स इंडिया, मानस ऍग्रो इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या सहा कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल विकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. या कंपन्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीत आल्यानंतर या क्षेत्रात एकूण 14 कंपन्या असतील. पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांच्या मार्केटिंगमध्ये येणार्या अधिक कंपन्यांचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. कारण पूर्वीपेक्षा जास्त पेट्रोल पंप उपलब्ध होतील. चांगली सेवा आणि दर्जा यावरच व्यवसाय वृद्धी होत असल्याने ग्राहकांचा फायदा होईल.
तज्ज्ञांच्या मते, 2019 मध्ये सुधारित बाजार वाहतूक इंधन नियमांच्या आधारावर, खासगी कंपन्यांना पेट्रोल उत्पादनं म्हणजेच इंधन विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार, किमान निव्वळ मालमत्ता 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कंपन्यांना डिझेल आणि पेट्रोल विक्रीचे नवीन परवाने दिले जातील. त्यासाठी कंपन्यांना सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. आधी तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार, कंपन्यांना परवाना मिळाल्यानंतर पाच वर्षांच्या आत किमान 100 पेट्रोल पंप उघडणं आवश्यक असेल. यापैकी पाच टक्के पेट्रोल पंप ग्रामीण भागात उघडावे लागतील. सध्या पेट्रोलियम उत्पादनांच्या विपणनामध्ये केवळ सरकारी कंपन्या कार्यरत आहेत. देशातल्या 90 टक्के पेट्रोल पंपांवर सरकारी कंपन्यांचं नियंत्रण आहे. उर्वरित 10 टक्के पेट्रोल पंपांची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, शेल आणि नायरा एनर्जी यांची आहे. ग्रामीण भागात पेट्रोल पंपांची संख्या वाढवणं हा नवीन कंपन्या जोडण्यामागे सरकारचा हेतू आहे.
येत्या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खाली येऊ शकतात. याशिवाय, अनेक ऑफर्सदेखील मिळू शकतात. आता खासगी कंपन्यांच्या आगमनामुळे बाजारात स्पर्धा वाढणार आहे. यामुळे तेलाच्या किमतीही कमी होतील. या क्षेत्रात खासगी कंपन्या आल्यामुळे ग्राहकांना खूप फायदा होऊ शकतो. अधिक कंपन्यांच्या आगमनाने अधिक पेट्रोल पंप उभे राहतील. ग्रामीण भागातही पेट्रोल पंप सुरू होतील. सेवादेखील चांगली होईल. दुसरं म्हणजे खासगी क्षेत्रात सामील होऊन कंपन्या अनेक ऑफर्स देतील तसंच त्यांची विक्री वाढवण्यासाठी इंधनाची किंमत कमी करतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai