उपवासाच्या दिवशी हे तीन पदार्थ अजिबात खाऊ नका!
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 26, 2023
- 505
श्रावण महिना हा जितका सणांचा महिना आहे, तितकाच उपवासांचाही महिना आहे. श्रावणापासून सुरू झालेली उपवासांची गाडी नवरात्र संपेपर्यंत चालूच राहते आणि मग या उपवासासोबत किचनमध्ये आगमन होतं ते साबुदाण्याची खिचडी, चहा कॉफी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याचा चिवडा, रताळी अशा बऱ्याच पदार्थांचं. आपल्याकडे उपवास ठेवणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली, तरी उपवासाला दुप्पट खाणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. उपवासाला आपल्याकडे बनवले जाणारे पदार्थ हे चविष्ट आणि चवदार असले तरीही ते बऱ्याचदा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. बघूया कोणते आहेत ते उपवासाचे पदार्थ जे तुमचे आरोग्य बिघडवू शकतात!
गरमागरम चहा आणि कॉफी -
उपवास आणि चहा हे महाराष्ट्रातल्या घराघरातलं कॉम्बिनेशन आहे. दिवसातून दोनदा चहा पिणारे लोक उपवासाच्या दिवशी चार-पाच वेळा सहज चहा पितात. त्यामुळे बऱ्याच जणांना डिहायड्रेशनच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. ज्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी, यासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. श्रावणामध्ये आपल्याकडे श्रावणी सोमवार श्रावणी शुक्रवार अशा साप्ताहिक उपवासाची परंपरा आहे. वास्तविकता हे उपवास आपल्या पचनसंस्थेला आराम देण्यासाठी, केले जातात. परंतु पाचनसंस्थेला खरा आराम मिळण्याऐवजी, एका मागून एक चहाचे प्याले रिचवले जातात. दीर्घ काळापर्यंत चहाचे अतिसेवन केल्याने, चहातील टॅनिन हा घटक शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी करतो. ज्यामुळे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता, ॲनिमिया यासारखे रोग होण्याची शक्यता असते. कॉफीबद्दल सांगायचं झालं तर, त्यातील कॅफेन आणि इतर घटकांमुळे निद्रानाश आणि चिडचिडला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शक्यतो उपवासाच्या वेळी नारळ पाणी, सरबत, फळांचे ज्यूस यासारख्या गोष्टींचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
तळलेले पदार्थ-
उपवास म्हटल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचे वेफर हे ओघानेच आलं. उपवासाला बटाटा, आणि साबुदाणा यासारखे पदार्थ खाण्यामागे सतत कार्बोहायड्रेटचा पुरवठा होत राहावा हे कारण असते. साबुदाण्याचा ग्लायसिमीक इंडेक्स लो असल्याने आपल्या शरीराला दीर्घकाळ कार्बोहायड्रेटचा पुरवठा होत राहतो ज्यामुळे शरीराची दिवसभराची ऊर्जेची गरज पूर्ण होते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात हे पदार्थ तळून खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. कारण पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंद झालेली असते, त्यामुळे असे पदार्थ व्यवस्थितरित्या पचत नाहीत. म्हणूनचं शक्यतो बटाट्याच्या वेफरऐवजी उकडलेले बटाटे, आणि चटपटीत मसालेदार साबुदाणा खिचडीऐवजी साधी साबुदाण्याची खिचडी असे पर्याय निवडावे.
आंबट फळे -
उपवासाला आपल्याकडे सर्रास वेगवेगळी फळे खाल्ली जातात. त्यामुळे फळांची निवड करताना संत्रे, मोसंबी, लिंबू, किवी, आवळा यासारखी फळे टाळावी. कारण यामुळे ऍसिडिटी अजूनच वाढण्याची शक्यता असते. त्याऐवजी केळी, सफरचंद यासारखी फळे खावी.
एकंदरीत विचार करता उपवासाच्या दिवशी चटपटीत तळलेले पदार्थ खाण्याऐवजी फळे, उकडलेली कंदमुळे खाणे फायद्याचे ठरते. हृदयविकार, डायबिटीस आणि किडनीचे आजार असलेल्या लोकांनी उपवास करणे शक्यतो टाळावे. कारण श्रद्धा जपताना, स्वास्थ्य जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
लेखक - आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर आणि साक्षी संजय नानकर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai