Breaking News
मुळातच श्रावण महिना संपूर्णपणे सण-उत्सावांचाच असल्यामुळे श्रावणात उपवासाच्या आणि बिन उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असतेच. दिव्याची अमावस्या झाली की, श्रावण सुरू होतो. यावर्षी अधिकमास श्रावणाच्या आधी आल्याने काहीजण दोन महिने लागून उपवास करतात. श्रावणात पहिला मोठा सण येतो तो नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे उकडलेले पदार्थच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे नागपंचमीला काही ठिकाणी ‘दिंडं', ‘पात्या', ‘धोंडस' केले जातात. हे तीनही पदार्थ एकच केवळ प्रांतानुसार नाव वेगळी. काही ठिकाणी ‘शेंगा' म्हणजेच उकडीच्या करंज्या केल्या जातात. दिंडं करताना पुरण न वाटता पळीने घोटून बारीक करतात आणि मोहन घालून घट्ट भिजवलेल्या कणकेच्या पुर्या लाटून त्यात पुरण भरून सगळ्या बाजूंनी दुमडून चौकोनी आकार देतात आणि उकडतात. त्याच कणकेच्या नुसत्या उकडलेल्या पुर्यांना ‘पात्या' म्हणतात, नागपंचमीच्या नैवेद्यात दिंडं, पात्या आणि फरसबीची भाजी हे मुख्य पदार्थ असतात. नैवेद्याला शेंगा असतील तर त्या सोबत बिरडं घातलेली अळूची भाजीही आवर्जून केली जाते. नागपंचमीनंतर येणार्या श्रावण षष्ठीला कोकणात पातोळे किंवा पानगी करण्याची पद्धत आहे. तांदळापासून केली जाणारी ही पानगी हळदीच्या पानात उकडली जात असल्यामुळे त्यांना वेगळाच स्वाद येतो. त्यानंतर येते ती शिळा सप्तमी. या दिवशी ‘सांदणी' हा विशेष पदार्थ केला जातो. तांदळाचा रवा भाजून त्यात नारळाचं दूध, गूळ, जायफळ, वेलची वगैरे घालून, वाफवून सांदणी तयार करतात. त्यासोबत नैवेद्यासाठी अळूवडी आणि वालाचं बिरडंही असतं. सीकेपी समाजात शिळासप्तमीला वडाच्या फांदीची पूजा करतात आणि नैवेद्याचे थोडे थोडे पदार्थ पाण्यात सोडतात.
श्रावणात वेगवेगळ्या प्रकारची व्रतं केली जात असल्यामुळे उपवासही पुष्कळ असतात. श्रावणी सोमवार आणि शनिवारचा उपवास तर हमखास केला जातो. उपवासाचे पदार्थ आपल्याला माहीत असतात किंवा आजकाल त्यात नवनवे प्रयोगही होत असतात, पण श्रावणातील उपवास सोडण्यासाठी देखील वेगवेगळे पदार्थ केले जातात. कधी नेहमीची मुगाची खिचडी, कधी बिरडं घातलेली खिचडी तर कधी ओला वाटाणा घातलेली खिचडी रात्रीच्या जेवणात केली जाते. त्यानंतर गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा श्रावणातला महत्त्वाचा दिवस येतो. या दिवशी अर्थातच दही, पोहे, लाह्या इ. एकत्र करून केलेला काला नैवेद्याला असतो. त्याशिवाय ‘भरली केळी' हा पदार्थही असतो. अत्यंत चवदार असा पदार्थ करण्यासाठी पिकलेल्या राजेळ्या केळ्यांना मागून छेद देतात. मोदकासाठी करतो तसं सारण करून ते केळ्यात भरतात आणि पातेल्यात तुपावर ठेऊन वरून दूध शिंपडतात. याला वाफ दिली की भरली केळी तयार. भरल्या केळ्याबरोबरच कांदा भजी आणि ओल्या वाटाण्याची खिचडी हा खास नैवेद्य असतो. श्रावण पौर्णिमा आणि श्रावण अमावस्या यांनाही विशेष महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, त्यामुळे या दिवशी सर्रास नारळीभात किंवा ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरवडीचा मेन्यू असतो. तर श्रावण अमावस्या म्हणजेच मातृदिनाला मात्र वेगवेगळे पदार्थ केले जातात.
श्रावण महिना म्हटला की, सण-समारंभाप्रमाणे उपवासाचे दिवसही सुरू होतात. अशावेळी नेहमीची साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ, बटाटा रताळ्याचे काप हे नेहमीचे पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो आणि मग कधी एकदाचा श्रावण संपतो असे देखील होते. मात्र, यंदा तुम्हाला तसे मुळीच वाटणार नाही. कारण आरोग्याचं गणित सांभाळून जीभेचे चोचले पुरवणारे काही चविष्ट पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर पाहुया उपवासाचे 5 चविष्ट पदार्थ.
‘रताळ्याची कचोरी'
सारणाचे साहित्य
कृती
सर्वप्रथम रताळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. त्यानंतर कुस्करून बारीक करावे. त्यात थोडे मीठ घालावे. अर्धा चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात 1 वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी खवलेले खोबरे, 45 हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅम बेदाणा, चिमूटभर मीठ आणि चवीनुसार साखर सर्व वस्तू घालून सारण तयार करावे. त्यानंतर रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्या तयार कराव्यात. त्यानंतर त्या कचोऱ्या वरीच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात आणि गरमगरम खायला द्याव्यात.
‘बटाटावडा'
साहित्य
कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करुन घ्यावेत. त्यानंतर कढईत तेल किंवा तूप घेऊन त्याला जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यात आलं, मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाट परतून घ्यावा. त्यानंतर राजगिरा किंवा शिंगाडा पीठ घेऊन त्यात बुडवून तळून घ्यावे. अशाप्रकारे उपवासाचे बटाटेवडे तयार.
‘साबुदाणा थालीपीठ'
साहित्य
कृती
भिजवलेल्या साबुदाण्यांमधून पाणी विलग करावे. नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करावेत आणि बारीक केलेले मिरच्यांचे तुकडे, शेंगदाण्याचा कूट, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ हे जिन्नस देखील त्यामध्ये घालावेत. सर्वं मिश्रण हातानेच छान एकजीव करुन घ्यावे. आता, तयार मिश्रणाचे थालीपीठ थापून घ्यावे. थालीपीठाला मध्यभागी तूप सोडण्यासाठी हलकेच भोक पाडावे. आता, नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यावे आणि दहीसोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
‘इडली'
साहित्य
कृती
सर्वप्रथम भगर आणि साबुदाण वेगवेगळे भाजून घ्यावेत. त्यानंतर साबुदाणा मिक्सकरवर रवाळ बारीक करुन घेणे. मग दोन्ही साहित्य दह्यामध्ये भिजवून दोन तास तसेच भिजत ठेवणे. मग त्यात थोडा खाण्याचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ घालून नेहमीप्रमाणे इडली करणे.
घावन
साहित्य
कृती
साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा आणि वरीतांदूळ बुडून वरती 2 इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही 4-5 तास भिजवावे. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू नीट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai