Breaking News
पंचांगानुसार, या वर्षी आश्विन महिन्याची पौर्णिमा शनिवार, 28 ऑक्टोबरला पहाटे 4.17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रविवार, 29 ऑक्टोबरला पहाटे 01.53 वाजता समाप्त होईल. शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदया तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल. 2023 मध्ये शरद पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 05:20 आहे.
अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. या रात्री 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे. पुर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चंन्द्र सोळा कलांनी परिपुर्ण असल्याने या रात्रीचे हिंदु धर्मात खुप महत्व आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास आयोजित केला होता. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याचे सांगितले आहे.
पावसाळा संपल्यानंतर येणारी ही पहिलीच पौर्णिमा. पावसाच्या चार महिन्यांमधे आकाश स्वच्छ आणि निरभ्र नसतं परंतु अश्विनातल्या या पौर्णिमेला आकाश खुप दिवसांनी अगदी स्वच्छ असतं आणि चंद्र सुध्दा प्रथमच एवढा मोठा आणि समिप भासतो त्यामुळे या स्वच्छ आणि कोरडं वातावरण फार दिवसांनी वाटयाला आल्याने त्याचे अप्रुप वाटणे अगदी साहजिक असते. त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात. रात्रभर आप्तेष्ट आणि मित्रमंडळी चंद्राच्या प्रकाशात गप्पा गोष्टी करत गाण्यांच्या भेंडया, भजनं म्हणत दुधाच्या अवतीभवती बसतात. चंद्राची किरणं त्या दुधात पडतायेत नां याची काळजी घेतल्या जाते आणि दुध आटल्यानंतर यथेच्छं त्याचे सेवन करण्यात एक वेगळीच मजा येते.
या दिवशी रात्री दूध गरम करून त्यामध्ये चंद्राला पाहतात. शरद ऋतूमध्ये मसाला दूध आरोग्यास चांगले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागिरीला उत्तररात्री पर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येेष्ठ दांपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात.
दूध आटविण्याचे महत्त्व
असे मानले जाते की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही लाभदायक असते. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या दुधाचा फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे विशेष मानले जाते. रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवुन त्यात केशर आदी मसाला घालुन ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधुन अधीक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करतं. तांदुळामध्ये स्टार्च असल्याने ही प्रक्रिया आणखीन सुलभ होते. यामुळेच पुर्वीपासुन ऋषीमुनींनी दुध चंद्रप्रकाशात आटवण्यासंबंधी सांगीतले आहे. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.
पौराणिक कथा
1) पुर्वी एक सावकार होता त्याला दोन मुली होत्या त्या दोघीही शरद पौर्णिमेचे व्रत करायच्या. मोठी कन्या व्रत संपुर्ण भक्तिभावाने पुर्ण करायची आणि धाकटी व्रत अर्धवट सोडायची. पुढे दोघींचा विवाह झाला धाकटी कन्या व्रत अर्धवट करत असल्याने तिला होणारे मुल जन्मल्याबरोबर मरून जायचे. ब्राम्हणाजवळ याची विचारपुस केल्यानंतर शरद पौर्णिमेचे व्रत अर्धवट केल्याने तिच्यावर ही आपत्ती आल्याचे तिला कळले. ब्राम्हणांनी सांगीतल्याप्रमाणे तीने व्रत पुर्ण केले. तीला संतान प्राप्ती झाली पण ते मुल देखील लगेच मृत झाले तीने त्या मुलाला एका पाटावर ठेवले आणि त्याला व्यवस्थीत झाकले. तीने आपल्या मोठया बहिणीला बोलावले आणि तोच पाट बसावयास दिला. ज्याक्षणी मोठया बहिणीच्या वस्त्रांचा स्पर्श बाळाला झाला ते जीवंत होवुन मोठमोठयाने रडावयास लागले. ती धाकटीला म्हणते “ज्या पाटावर बाळाला ठेवतेस तोच मला बसायला दिला माझ्या बसण्याने त्याचा जीव गेला असता तर?” त्यावर धाकटी बहिण म्हणाली तुझ्या स्पर्शामुळेच तर तो जिवंत झालाय. या प्रसंगानंतर तीने त्या नगरात सर्वांनाच शरद पौर्णिमेचे व्रत करावयास सांगितले.
2)प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
आख्यायिका
1. लंकाधीपती रावण या अश्वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगितली आहे.
2. लक्ष्मीदेवी या रात्री आकाशातुन भ्रमण करते आणि “कोजागरती” अर्थात कोण कोण जागरण करतय हे पाहाते. आणि जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहातो म्हणुन देखील या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai