
ममतांचे कथित ममत्व
- by संजयकुमार सुर्वे
- Dec 03, 2021
- 665
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 साली देशांतर्गत होणार्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी मुंबईला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेऊन मोदींना हरवण्यासाठी विरोधकांनी कसे एकत्र आले पाहिजे याबाबत चर्चा केली. ममता बॅनर्जी यांनी अमित शहा-नरेंद्र मोदींना टक्कर देत बंगाल जिंकल्याने राष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारे प्रखर विरोध भाजपाला विरोधकांनी करावा अशी अपेक्षा त्यांनी बाळगणे यात काही गैर नाही. पण एकटे बंगाल जिंकल्याने ममतांना जर पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असतील तर ते चुकीचे आहे. ममतांना अजूनही राष्ट्रीय स्तरावर सर्वमान्यता नसून त्यांचा लहरी स्वभाव, आक्रस्थाळेपणा हा राष्ट्रीय स्तरावर स्विकाहार्य नसून सर्व पक्षांना एकत्र घेऊन जाणार्या सामायिक नेतृत्वाची गरज आज देशाला आहे. मोदींचा कार्यकाळ म्हणावा तेवढा चांगला नसल्याचा अनुभव देशवासीयांनी घेतला आहे. मोदीही आता आपल्याला सत्तेची लालसा नसून देशसेवेचे पालूपद ‘मन कि बात’ मध्ये ऐकवू लागले आहेत. याचाच अर्थ आपले अवतारकार्य संपत आल्याची चाहूल कदाचित त्यांना लागली असावी. त्यांचे निकटवर्ती असलेल्या उद्योगपतींनी यापूर्वीच परदेशात गमन केल्याने मोंदींच्या ‘मन की बात’ ला दुजोरा मिळतो.
आता 2022 मध्ये देशात 5 राज्यात निवडणूक होणार आहेत. त्यात गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. आतापासूनच सर्व्हे जाहीर होऊ लागले असून त्यात मणिपूर, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडात काँग्रेस सत्तेत येणार असल्याच्या बातम्या सर्वच चॅनेल्सवर झळकू लागल्या आहेत. ज्या राज्यातून दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग जातो त्या राज्यात सत्तांतर अटळ मानले जात असून सपाचे अखिलेश यादव उत्तरप्रदेशचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. आम आदमी पार्टी आणि इतर छोट्या पक्षांशी हात मिळवणी करून यादवा यांनी आपली आघाडी मजबूत केली आहे. युपीमध्ये गेल्या महिन्यापासून मोदी यांनी कार्यक्रमांचा सपाट लावला असला तरी मिळणार्या प्रतिसादावरून तेथील लोकांची नाराजी स्पष्ट दिसते. त्यातच जे फोटो उत्तरप्रदेश सरकारने जाहिरातींमध्ये वापरले त्यावरूनही मोठी फजिती मोदी-योगी जोडगोळीची झाली आहे. अखिलेश यादव यांच्या योग्य कि योगी सरकार या घोषणेला जनसभांमधून चांगलाच प्रतिसाद मिळत असून त्यामुळे भाजपाची चिंता वाढली आहे. आता भाजपचा सारा खेळ काँग्रेस, बसपा आणि एमआयएम हे पक्ष अखिलेश यांची किती मते खातात यावर अवलंबून आहे.
ममता यांचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती विरोधकांपुढे मांडली आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती आणि चंद्राबाबू नायडू यांची पंतप्रधान बनण्याची मनीषा सर्वश्रुत आहे. त्यातच शरद पवार जरी सर्वसमावेशक नेतृत्व देऊ शकत असले तरी आता शारीरिक दृष्ट्या सक्षम नाहीत. मायावतींनी 2019 साली सरकार येण्यापुर्वीच पंतप्रधान बनण्याची अट युपीएला घातली. ममता बॅनर्जी जरी सक्षम असल्या तरी त्यांचे नेतृत्व त्यांच्या स्वभावामुळे सर्वमान्य नाही. चंद्राबाबू नायडू हे अनुभवी असले तरी त्यांची राज्यात सत्ता नसल्याने सध्या यूपीएकडे नेतृत्व द्यावे असा चेहरा नाही. काँग्रेसचे प्रियांका आणि राहुल जरी डार्क हॉर्स असले तरी त्यांना स्वबळावर देशातून 170 जागा निवडून आणाव्या लागतील जे विरोधीपक्ष हे होऊ देणार नाही. शरद पवार सामूहिक नेतृत्वाची गरज बोलून दाखवत आहेत ते त्याचसाठी. विरोधकांत असलेल्या विस्कळीतपणाचा फायदा पुन्हा मोदींना निश्चितच होणार आणि त्यासाठी निवडणुकीत विरोधकांमध्ये फुट कशी पडेल याची पुरेपूर काळजी भाजप घेईल.
ममता यांनी मुंबई भेटीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या तिरकस उत्तरामध्येच 2024 मध्ये भाजपच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवल्याचे दिसत आहे. त्यांनी यूपीए कुठे आहे? असा थेट प्रश्न विचारून काँग्रेस संपली असून आपल्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करावी असे सूचवले आहे. खरतर कोणत्याच पक्षाकडे संपूर्ण देशात उमेदवार उभे करण्याइतके संघटन आणि पक्षीय ताकद नाही. एक-दोनदा 20-25 खासदार असलेल्या पक्षांकडे पंतप्रधानपद गेल्याने आता 20-25 खासदार असलेल्या सर्वच पक्षांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. हीच स्वप्ने आज यूपीएच्या र्हासाला कारणीभूत ठरली. काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष राष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला 37% मते तर काँग्रेस पक्षाला 19% मते मिळाली होती. उरलेल्या पक्षांना सरासरी 3-4% मते मिळाली आणि एवढ्या तुटपूंजीवर पंतप्रधानपद मागावे हे निश्चितच भूषणावह नाही.
ममतांना बंगालमध्ये मिळालेला विजय हा त्यांच्या प्रयत्नामुळे मिळाला हे जरी खरे असले तरी 90 हुन अधिक जागा फक्त 3000 मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत. यावेळी अल्पसंख्यांक समाजाने दाखवलेला समजूतदारपणा आणि राहुल गांधी यांनी शेवटच्या टप्प्यात बंगालकडे फिरवलेली पाठ हेही घटक ममतांच्या विजयास तेवढेच कारणीभूत आहेत. ममतांना जर खरोखरच मोदींना शह द्यायचा असेल तर त्यांनी निरपेक्षपणे आघाडीचे नेतृत्व करावे. येणार्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये स्वतः सहभाग घेऊन जिथे-जिथे ज्या पक्षाचे सरकार येण्याची शक्यता असेल तिथे तिथे आपला खारीचा वाटा अर्पण करावा. लोकसभा आणि भविष्यात होणार्या इतर राज्यांच्या निवडणुकीचा विचार करून प्रत्येक राज्यात सर्व विरोधकांत समेट घडवून 2024 पूर्वी सर्व राज्ये विरोधकांच्या नेतृत्वाखाली आणावी. त्यानंतरच लोकसभा निवडणुकीत मोदींशी सामना करावा. पण हे वाटते तितके सोपे नाही, कारण प्रत्येक नेता आणि त्यांची स्वप्ने भाजपच्या प्रत्येक पडावा बरोबर प्रसरण पावतील आणि तीच युपीएच्या सत्तास्थापनेतील बेड्या ठरतील. ममता आज जरी मोदींविरोधात लढण्यासाठी उत्साह दाखवत असल्या तरी त्यांचे हे ममत्व औट घटकेचे ठरणार नाही याची शाश्वती त्यांना स्वतःलाच नाही. उद्या भाजपाकडूनच जर उपपंतप्रधान पदाची ऑफर आली तर हेच ममत्व कोणाच्या पायाशी लोळण घेईल याचे उत्तर काळच देईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे