Breaking News
औरंगाबाद येथे पार पडलेल्या समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खोडसाळपणाचे वक्तव्य केले. राज्यपालांच्या वक्तव्याचे आश्चर्य यासाठी वाटत नाही कारण राज्यपाल जी टोपी घालतात त्या टोपीखालील मेंदू गहाण असतो हे जगजाहीर आहे. समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारतो या वाक्यात सुद्धा रामदासांचा सन्मानाने तर शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. यातच सगळं आलं.
रामदास हे 16 व्या शतकातील एक गोसावी होते. त्यांना संत, समर्थ, स्वामी ही विशेषणे आपण लावू शकत नाही कारण ते विषमतावादी होते. संत हे समतावादी असतात. संत हे जाती-धर्म-पंथाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या ठायी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. पण रामदास म्हणतात ब्राह्मणांपेक्षा कुणी श्रेष्ठ असूच शकत नाही. ब्राह्मणच भगवंत आहे. ब्राह्मणाला देवसुद्धा वंदन करतात. ब्राम्हण हा मूर्ख जरी असला तरी जगाने त्याला वंदन करावे. आता मला एक असा संत सांगा ज्याने एकाच जातीचे श्रेष्ठत्व सांगितले आणि मान्य केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कधी म्हंटलं की, कुणबीच सर्वात श्रेष्ठ असतात बाकी सगळे कनिष्ठ असतात म्हणून? संत रविदास महाराजांनी कधी म्हंटल की, चर्मकार हेच सर्वश्रेष्ठ असतात बाकी सगळे दुय्यम असतात म्हणून? संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार यांनी कधी म्हंटले का की, माळी जातीचे लोकच सर्वात श्रेष्ठ? कुंभार समाजाचे लोकच सर्वात उच्चवर्णीय असतात म्हणून? ह्या संतांनी समानता आणली. विश्वबंधुतेला मान्यता दिली. प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून पाहिले म्हणून हे सगळे समतावादी खरे संत ठरतात तर ‘जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ असे म्हणणारे विषमतावादी रामदास हे संत ठरत नाहीत.
छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवरायांनी अफजल खानाचा वध केला 10 नोव्हेंबर 1659 मध्ये. शाहिस्तेखानाची बोटे कापली 5 एप्रिल 1663 ला. पुरंदरचा तह झाला 11 जून 1665 मध्ये. शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटका करून घेतली 18 ऑगस्ट 1666 ला. त्यानंतर त्यांनी तहात गमावलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले आणि राज्याभिषेकाची तयारी सुरु केली. म्हणजे हे सर्व पराक्रम 1666 च्या अगोदर शिवरायांनी गाजवले होते, माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनातच स्वराज्याची स्थापना केली गेली. जिजाऊंनीच दोन्ही छत्रपती घडवले.
आता रामदास व शिवाजी महाराजांच्या भेटीविषयी बघुयात. खुद्द रामदासांच्या केशव गोसावी नावाच्या एका शिष्याने, दिवाकर गोसावी नावाच्या दुसर्या एका शिष्याला 4 एप्रिल 1672 रोजी एक पत्र लिहिले आहे, त्याचा मजकूर असा की, आपण पत्र पाठविले ते पावले. मजकूर समजला. राजेश्री शिवाजी राजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले, ते समजले... राजे यांची पहिलीच भेट आहे.. म्हणजे 4 एप्रिल 1672 च्या अगोदर रामदासांची व शिवरायांची भेट झाली नव्हती. हा पुरावा रामदास संप्रदायातील अस्सल कागदपत्रात आहे. खुद्द रामदासांच्या शिष्यानेंच तो दिला आहे.
आता शिवाजी महाराजांचे गुरु म्हणविल्यानंतर बालपणापासून त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना विविध युद्धकलांचे प्रशिक्षण देणे, त्यांना राजकारणाचे धडे देणे त्यासाठी वारंवार भेटी घेणे हे सर्व अपेक्षित आहे. परंतु 1672 साली पहिली भेट होणार म्हणून पुरावा आहे. भेट झाली म्हणून पुरावा नाही. 1672 पर्यंत छत्रपती शिवरायांनी पूर्णपणे स्वराज्याची स्थापना केली होती. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाला रामदासांना शिवरायांनी बोलाविले नाही. रामदास सुद्धा स्वतः हजर राहिले नाही. हा राज्याभिषेक करण्यासाठी कुणीही ब्राम्हण तयार नसतांना रामदासांनी का राज्याभिषेकाला ब्राम्हण पुरविले नाही? का स्वतःहून हजर राहून स्वतः राज्याभिषेक केला नाही? का राज्याभिषेकासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकही ब्राम्हण भेटला नाही? का हजारो किलोमीटर दुरून गागाभट्टाला पाचारण करावे लागले? मिर्झा राजा जयसिंग, दिलेरखान म्हणजेच पर्यायाने औरंगजेब जिंकावा आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा यासाठी 400 ब्राह्मण कोटीचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. त्यासाठी दिलेरखानाकडून मोठी रक्कम त्यांनी घेतली. मग ह्या 400 ब्राम्हणांना रामदासांनी का अडविले नाही? का सांगितले नाही की, शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत अडथडा निर्माण करू नका? छत्रपती शिवरायांच्या काळातील इतिहासाच्या अभ्यासाची विश्वसनीय व महत्वपूर्ण साधने-ग्रंथ म्हणजे परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली व राधामाधवविलासचंपू हे आहेत. आणि सर्वात विश्वसनीय बखर म्हणजे सभासदाची बखर ही आहे. हे सर्व ग्रंथ याकरिता विश्वसनीय समजले जातात कारण हे शिवाजी महाराजांच्या काळात लिहिले गेले आहेत. पण यापैकी एकही ग्रंथात रामदासांच्या नावाचा साधा उल्लेख देखील नाही. त्याचप्रमाणे रामदासकाळात किंवा त्यानंतर लगेच लिहिले गेलेले रामदासी संप्रदायाचे ग्रंथ जसे दिनकर स्वामीचा ‘स्वानुभाव दिनकर’, मेरुस्वामींचा ’रामसोहळा’ यांमध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख देखील नाही. यावरून हे सिद्ध होते की हा गुरु शिष्य संबंध खोटा आहे. मग हे संबंध जोडले कधी गेले? तर छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर 100 ते 125 वर्षानंतर म्हणजेच पेशवे काळात लिहिलेल्या रामदासी बखर व त्याच काळात लिहिल्या गेलेल्या इतर मराठी बखरींमधून हा काल्पनिक संबंध जोडला गेला आहे. शिवरायांच्या काळात लिहिल्या गेलेल्या बखरी खर्या की त्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी लिहिल्या गेलेल्या खर्या? सभासदाची बखर ही 16 मार्च 1694 ते 13 मार्च 1697 दरम्यान राजाराम महाराजांच्याच काळात लिहून पूर्ण झालेली आहे. कृष्णाजी अनंत सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिली आहे. रामदास आणि शिवरायांचे संबंध असते तर ते राजाराम महाराजांना नक्कीच माहिती असते आणि त्या संबंधांचा उल्लेख सभासद बखरीत आला असता. पण तसे झाले नाही. (क्रमशः)
-चंद्रकांत झटाले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai