Breaking News
गुंतवणुकदारांना पाच लाख कोटींचा फटका बसल्यानंतरही गौतम अदानी व केंद्र सरकारला जराही फरक पडलेला दिसत नाही. या सर्वात मोठ्या शेअर घोटाळ्याने भारताची इज्जत जगभरात गेल्यावरही ईडी, सीबीआय, आयकर आणि सेबीने झोपा काढणं सुरूच ठेवलंय. सरकारला ज्यांचा जाच होतो, अशांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या या यंत्रणा कोट्यवधींचा चुना गुंतवणुकदारांना लागत असताना इतक्या मुर्दाड कशा? हा प्रश्न भारतीयांना पडला आहे. या घोटाळ्याने जगातले अनेक उद्योजकांसोबत देशातील सर्वसामान्य ठेवीदारांच्याही खिशाला त्याने भोक पाडलंय. सरकार मिंधं असलं की काय होतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे हा घोटाळा होय. मोदींचं सरकार सत्तेवर आल्यापासून अशा घटना घडतच आहेत. दीड लाख कोटींहून अधिक रक्कमेचा कर्जबाजारी असलेला हा उद्योजक देशाला कधीतरी बुडवेल, अशी चर्चा विरोधक आणि अर्थविभागाशी संबंधित अनेक मान्यवर करत होते. पण त्यांना ना सरकारने दाद दिली ना तपास यंत्रणांनी. तपास यंत्रणा तर सरकारच्या बटिकच. तेव्हा त्यांच्याकडून फारशी अपेक्षाच नव्हती. पण जेव्हा देशाला लुटलं जातं तेव्हा तरी या यंत्रणा दखल घेतील आणि देशाला संकटातून वाचवतील ही आशाही धुसर ठरली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना नामोहरम करणाऱ्या या यंत्रणांनी आपली इभ्रत केव्हाच घालवली. या घोटाळ्याच्या निमित्ताने यंत्रणांना आपला तपासी कसब दाखवण्याची संधी होती. पण अदानी पठ्ठया पडला गुजराती. त्यात देश चालवणारे दोन प्रमुख गुजराती. इतर सगळे त्यांच्या ताटाखालची मांजरं झाल्याने या दोघांना देश आंदण दिल्यागत झाला आहे. देशाला लुटून खाणाऱ्या 17 जणांविषयी या यंत्रणांनी दाखवलेला दुर्लक्षपणा लक्षात घेता अदानींबाबत या यंत्रणांकडून फारकाही होईल, अशी अपेक्षाच नाही.
मोदी सरकारने शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तोंडावर हिंडेनबर्ग या संस्थेने आपला अहवाल प्रसिद्ध करणे हा केवळ योगायोग आहे. अदानींसह सरकारचे जावई बनलेल्या 17 उद्योगांनी (ज्यात 11 जणं हे गुजराती) देशातील सामान्यांच्या कष्टाच्या बेगमीला 2014 पासून वासलात लावली. सुमारे साडेतीन लाख कोटींचा निधी गिळला. निरव मोदी असो वा मेहून चोक्सी, विजय मल्ल्या असो वा केतन पारेख या मंडळींची घेतलेली कर्जें ज्या प्रकारे राईटऑफ करण्यात आली, ती पाहता मोदी सरकार या उद्योजकांप्रति कमालीचं हतबल असल्यासारखं वागत आहे. भारताची विश्वासार्ह कंपनी एलआयसीला व स्टेट बँक ऑफ इंडियाला अदानींनी 40 हजार कोटींच्या खड्ड्यात घालूनही केंद्र सरकार याबाबत चुप्पी साधुन आहे. याउलट एलआयसीची गुंतवणुक कशापद्धतीने अदानींच्या कंपनीत सुरक्षित आहे याबाबत स्वतंत्र परिपत्रक एलआयसीकडून काढण्यात आले आहे. बेईमानीची हद्द पार झाली असतानाही सरकार व अदानी समुह राष्ट्रीत्वाची शाल ओढून भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत. चोर तो चोर वर शिरजोर, असा हा हीडीस प्रकार आहे.
संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत नाही तोच शेअर घोटाळ्याचा हा बॉम्ब पडला. सर्वपक्षीय बैठकीत अदानींचा विषय काढण्याचा प्रयत्न संजय सिंग यांनी केला. सरकारने चालवाव्या या साऱ्या संस्था अदानींच्या ताब्यात दिल्या. जगातील दुसरी उद्योजक बनलेल्या अदानींनी यासाठी भ्रष्ट मार्गाचा खुलेआम वापर केल्याचं उघड झालं. टॅक्स हेव्हन देशात त्याने बोगस कंपन्या तयार करून या कंपन्यांकरवी कोट्यवधीची स्वतःच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करुन त्याचे भाव वाढवले व या वाढीव शेअर्सच्या माध्यमातून लाखो कोटींची देशी-विदेशी कर्जे बँकांकडून घेतली असा आरोप हिंडेनबर्ग या संस्थेने केला आहे. यापुर्वी या संस्थेने अशाचपद्धतीने अमेरिका व चीन मधील बँकांनी कशापद्धतीने गुंतवणुकदारांची फसवणुक केली ते उघड केले होते. ज्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला त्यात टॅक्स हेव्हन देशांना आपण पैसे कुठून आणतो यासंबंधी कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नसते. या शेअरच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली आणि या कमाईच्या जोरावर आपण जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून टिमकी वाजवायला अदानीनी सुरुवात केली. हा अहवाल प्रसिद्ध होताच अदानी समुहाला गेल्या 9 दिवसात 9 लाख कोटींचा फटका बसला असल्याने अदानींची सुजलेली श्रीमंतीची अदा धुळीला मिळाली.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानींना राष्ट्रवादाचा पुळका आला. देशाची बदनामी केली जात असल्याचा आरोप हेंडनबर्ग यांच्यावर करण्यात आला. वास्तविक या व्यक्तीने 2017 पासून आजवर जागतिक स्तरातील 16 कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. ज्यात या कंपन्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचं उघड झालं आहे. यातून अमेरिका, चीन, जपानसारख्या श्रीमंत देशही सुटले नाहीत. भारतातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्यावर राष्ट्रवादाचा आव आणला जातो आहे. सरकारी भक्त डोळे उघडे ठेवून याचं समर्थन करतात यासारखा बिनडोकपणा कुठे पहायला मिळेल? संजय सिंग यांनी अदानी कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. भारतात कर्जावू रक्कम काढून विजय मल्या 10 हजार कोटी, निरव मोदी 20 हजार कोटी, मेहून चोक्सी 3 हजार कोटी, ललित मोदी 6 हजार कोटी, नितीन सरदेशी 2 हजार कोटी घेऊन देश सोडून पळाले. या बोगस व्यवहाराकडे लक्ष देणारी सेबी आजही निर्द्रेत दिसते आहे. अडीच हजार कोटी रुपयांच्या कर्जातील 74 हजार कोटी रुपयांची माफी देण्यात आली, तरी सेबी गप्पच.
अहवाल प्रसिध्द झाल्यावर उद्योजक हादरलं. गेल्या चार दिवसात अदानींचे शेअर कोसळू लागले. जगभरातील शेअर बाजारात 4 लाख कोटींचं नुकसान गुंतवणुकदारांना झाल्याचं स्पष्ट दिसतं. अदानींना 20 हजार कोटींचा आयएफओ परत घ्यावा लागला आहे. दिवसेंदिवस अदानींच्या शेअर्सची किमंत ढासळत असून ती कोणता तळ गाठेल याचा अंदाज गुंतवणुकदार घेत आहेत. आरबीआयने अदानी समुहाला दिलेल्या कर्जांची यादी सर्व बँकांकडून मागवली आहे. परंतु, अजूनपर्यंत सेबीने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज खोट्या राष्ट्रवादाच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न अदानी समुह करत आहे. तर ज्याचे विमान सत्ता मिळवण्यासाठी 2014 साली मोदींनी वापरले त्यांच्या सत्तेचे विमान या भवंडरात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा देशावर हल्ला आहे असे अदानींनी सांगूनही त्यांच्या बचावासाठी सरकारच्यावतीने कोणही बाह्या सरसावलेल्या नाहीत. त्यामुळे कोणाच्याही मेहरबानीवर सुजवलेल्या श्रीमंतीची अदा ही कधी ना कधी उतरतच असते हे चिरंतन सत्य आहे. त्यामुळे या श्रीमंतीवर सुजलेल्या सत्ताधाऱ्यांची सत्तेची अदा भारतीय जनता कधी उतरवते ते पाहणे आता आपल्या हाती आहे.
कालाय तस्मैय नमः, काल कालाय नमः....
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai