Breaking News
कर्नाटकच्या निवडणूक प्रचाराने घेतलेली रंगत आता भलत्याच मार्गावर येऊन ठेपली आहे. केलेल्या कामांच्या आधारे मतं मागण्याऐवजी सत्ताधारी भाजपने आपले भावनेचे पत्ते टाकण्याचं कारस्थान सुरूच ठेवलं आहे. आजवर कथित भ्रष्टाचाराच्या नावाखाली मतं मागून झाल्यावर पुलवामापासून उरीसारख्या घटनांचा आधार घेत कधी पाकिस्तानला शिव्या घालत तर कधी शहरी नक्षलींच्या नावाचा वापर करत भाजपने लोकभावनेला हात घातला आणि निवडणुका जिंकल्या. कर्नाटकची सार्वत्रिक निवडणूक त्याहून वेगळी आहे. पत्त्यांचे डाव आता चालेनासे झाले आहेत. शहरी नक्षलींचा वापर करणं आता अवघड आहे. पुलवामासारखी घटना घडली तर लोकं जोड्याने हाणतील अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर आता लिंगायतांच्या नावाखाली मतं मागण्याचा आचरटपणा सुरू झाला आहे. मात्र सत्ताधाऱ्यांची नाटकं आता लोकांना चांगली कळू लागली आहेत. यामुळे असे कोणतेही मार्ग यशस्वी ठरणार नाहीत. याकरिताच आता किड्या, मुंग्या, विंचू आणि विषारी सापांचा आधार घ्यावा लागतो आहे. कोणीतरी कुठेतरी मोदींना विषारी साप गणल्याचा आव आणत भाजपचे नेते त्याच विषारी सापाच्या नावाने मतं मागू लागले आहेत. भाजपात असे कमी वाचाळवीर नाहीत ज्यांनी आपल्या विरोधकांची बोलवण याहून खालच्या शब्दात केली नाही. विरोधी पक्षांवर खोटेनाटे आरोप करण्यासाठी असे असंख्य वाचाळवीर भाजपने पोसले आहेत. त्यांना मागे टाकतील असे प्रवक्ते म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, असे आहेत. आणि आयटी सेल तर त्यांना पुरेसं काम करत आहे. निवडणुकीच्या जाहीर सभांमधील भाषणं ही जुमलेबाजी असते असं सांगणाऱ्या भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि सलग आठ वर्षं देशाचे गृहमंत्री राहिलेल्या अमित शहा यांना आता ही जुमलेबाजी आठवत असेल, तर ते याचाच आधार मतं मागण्यासाठी कसा काय घेऊ शकतात, याचं उत्तर शहांनी दिलं पाहिजे.
कर्नाटकच्या राजकारणात स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्या भाजपने 100 कोटी रुपये मोजून निवडून आलेल्या तिथल्या काँग्रेस आमदारांना विकत घेत सत्ता स्थापनेचा केलेला खेळ कर्नाटकी जनतेला पचलेला नाही. आपण निवडून दिलेले आमदार भाजपसाठी असे विकले जात असतील तर उठसूठ लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार भाजपला नाही. सत्तेसाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे कर्नाटकच्या मतदारांना चांगलं ठावूक झालं. यामुळेच आता कुठल्याच मुद्यांचा आधार भाजप घेऊ शकत नाही. यातून मग जाहीर सभांमध्ये विंचू, सापांची आणि आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाच्या मुलीची थोतांड गोष्ट सांगण्याची वेळ पंतप्रधान मोदींवर ओढावली आहे. एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी किती सभा घ्याव्यात याला काही मर्यादा आहेत. यापूर्वी एक दोन सभा घेतल्या की पंतप्रधानांचं काम व्हायचं. धोरणांची आखणी पंतप्रधानांच्या भाषणांमध्ये असायची. संबंधित राज्यासाठी आपण काय केलं आणि काय करणार आहोत. याशिवाय देशाच्या कल्याणासाठी आपण काय केलं इतकं सांगितलं तरी ते पुरेसं व्हायचं. आज मात्र अत्यंत सुमार कामांचा दाखला दिला जातो. त्याचाही काही उपयोग होत नाहीए. काहीही न करता ते केल्याचा आव आणून उपयोग नसतो. आधीच देश आर्थिक संकटात आहे. यातच लोकांचे रोजगार गेलेले. जीएसटीने अर्धेअधिक उद्योग देशोधडीला लागलेले. दीड लाख कोटींच्या कर्जाचा बोजा असलेल्या उद्योगाला पोतड्या उघड्या करून दिल्या जात असल्याने प्रत्येकजण संशयाच्या जांजाळात आहे. अशा परिस्थितीत विंचू आणि सापांच्या नावे मतं मागण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको. पण आता मतदार हे विंचू आणि सापांपुढे पोहोचले आहेत. हे भाजपच्या लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी लिंगायतांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. लिंगायतांना चिथावणीची आणि अवमानाची भाषा केली की मतं मिळतील, अशी भाबडी अपेक्षा मोदींची दिसते आहे.
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून देणाऱ्या भाजपची अशी अवस्था कर्नाटकमध्ये का होते, आहे याचा कधी अभ्यास त्या पक्षाचे नेते करणार आहेत की नाहीत? एक दोनदा मतदारांना खोटं बोलून आणि फसवून त्यांच्यावर राज्य करता येईल. पण अशी जुमलेबाजी सतत कोणी स्वीकारू शकत नाही, हे भाजप नेत्यांना कळेल तोच त्या पक्षासाठी सुदिन म्हणावा लागेल. निवडणुका आल्या की नव्या मुद्यांची डोकी वर काढायची कला भाजपला चांगलीच जमली आहे. यातूनच पुलवामासारख्या घटना तो पक्ष पचवू शकला. सत्यपाल मलिक यांनी भांडाफोड केला नसता तर भाजपने कर्नाटकात काहीही केलं असतं आणि आलेल्या निवडणुका हातोहाथ जिंकल्या असत्या. मात्र ते दिवस गेलेत. लोकं समजली जातात तितकी निर्बुध्द नाहीत. टीव्हीच्या माध्यमातून कितीही गैरप्रचार केला तरी सोशल मिडियाचं व्यासपीठ हे अधिक तत्पर आणि सडेतोड आहे. तिथे सगळ्यांनाच विकत घेता येणार नाही, हे भाजपच्या लक्षात आलेलं दिसतं.
मलिकार्जून खरगेंनी मोदींना विषारी सापाची उपमा दिली आणि इतका काहूर माजवला गेला की मोदी जणू सौजन्याचा पुतळाच ठरले. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा प्रवास लक्षात घेतला तर त्यांच्या एकूणच वाटचालीचा लेखाजोखा हा सर्प दोषासारखाच होता हे अमान्य करण्यासारखं नाही. गुजरातची दंगल, त्यानंतर सत्तेसाठी काहीही करण्याची हुकमी चाल, आपल्याच सरकारमधले मंत्री हिरेन पंड्या यांची हत्या, न्यायमूर्ती लोया यांच्यासह आणखी दोन मंत्र्यांचा संशयास्पद मृत्यू, संजीव भट्ट यांचा तुरुंगवास या घटना कशाचं द्योतक आहे, हे एकदा भाजपच्या नेत्यांनी सांगावं. पुलवामा आणि उरीच्या घटना तर वरील घटनांना मागे टाकणाऱ्या विघातक कृत्यात मोडणारी कृत्यं होती. पंतप्रधान पदावरील व्यक्तीच या सगळ्या विघातकतेला जबाबदार असतो. विषारी साप या शब्दात बोलवण झाल्याने इतकं दु:ख करताना आपण काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांसाठी कोणत्या शब्दांचा वापर केला हे भाजपने एकदा पडताळून पाहिलं तर आपल्याला दिलेली विषारी सापाची उपमा किती सामान्य होती, हे लक्षात येईल. राहुल गांधी यांच्यासाठी खालच्या दर्जाचे व्यक्त झालेले शब्दप्रयोग पाहिले तर मोदींना विषारी साप संबोधणं सामान्यच होतं. सोनिया गांधी यांना बारगर्ल म्हणून हिणवणं ही तर भाजपच्या एकूणच संस्कृतीची वासलात होती. भाजप नेत्यांच्या विकृतीचा कळस या वक्तव्यांमध्ये होता. त्यामानाने विषारी सापाची उपमा अगदीच सामान्य म्हणता येईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai