Breaking News
कर्माचं फळ काय असतं, हे किरीट सोमय्या यांना आज कळून चुकलं असेल. ते कसं पचवावं याच्या चिंतेत ते गर्क असतील. या संकटातून सहीसलामत सुटोत, अशी सदिच्छा त्यांना आपण देऊयात. संकटात माणसाला मदतीचा हात द्यावा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जी किरीट सोमय्या या माणसाला कधी कळलीच नाही. महाराष्ट्राच्या बदनामीत या माणसाने इतकं टोक गाठलं की जगातला भ्रष्ट कारभार हा एकट्या महाराष्ट्रातच होत असावा, असं चित्र या माणसाने निर्माण केलं. हे करण्यासाठी भाजपने त्याला मोकळे सोडलं. भ्रष्टाचाराचा मसिहा म्हणून त्याने स्वत:च्या मागे लेबल तयार केलं. राज्याला बदनाम केलं इतकंच नाही, याच बदनामीने राज्य विकासाच्या गतीला पारखं झालं. जिथे खातो तिथे किमान शौच करू नये, ही सामान्य अपेक्षाही किरीटने पायदळी तुडवली. ज्या महाराष्ट्राने जगायचं कसं ते शिकवलं, राजकारणाचे धडे दिले. मुंबईने त्याला घडवलं, मोठं केलं, अंगाखांद्यावर खेळवलं त्यानेच महाराष्ट्राला, मुंबईला पायाखाली घेतलं. याचा इतका अतिरेक झाला की हा माणूस कुठे तरी अडकावा, असंच ज्याला त्याला वाटू लागलं होतं. भ्रष्टाचाराचा तारणहार म्हणवून घेणाऱ्या या माणसाला महाराष्ट्रातली जनता इतकी कंटाळली की त्याची गणतीही करता येणार नाही. कोणाच्या शारीरिक व्यंगावर कोणी बोट ठेवू नये, पण तरीही किरीटला तोतरेपणाचं लेबल लावण्याइतपत लोकांची मजल गेल्याचे सोशल मिडियावर पहायला मिळायचं. विक्रांतच्या मदतीच्या निमित्ताने आलेलं बालंट त्याने दुर्लक्षित केलं तेव्हाच त्याला लोकमानस कळायला हवा होता. पण सत्तेने त्याला आंधळं केलं होतं.
एका वृत्तवाहिनीच्या किचन कल्लाकार नामक कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी किरीट सोमय्या याला ‘बाबा सांभाळून राहत जा.. कधी काय होईल, सुपातून कधी जात्यात जाल हे कोणी सांगू शकत नाही' असा सबुरीचा सल्ला दिला होता. ज्या खडसेंनी हा सल्ला दिला त्या खडसेंनाही या माणसाने सोडलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना संकटात टाकलं तेव्हा भाजपचा एकही नेता त्यांच्या सोबत नव्हता. तेव्हा तर किरीट खडसेंच्या विरोधात आघाडीवर होता. भोसरीच्या कथित जमीन घोटाळ्यात खडसेंना अस्मान दाखवायला किरीट मागे नव्हता. भ्रष्टाचाराचे आरोप करताना किरीट हातचं राखायचा. त्यांनी केलेल्या आरोपातल्या एकाही नेत्याला शिक्षा झाली नाही. यावरून किरीट यांचं हे मिशन किती बोगस होतं हे समजते.
आरोप करून स्वत:चा गल्ला भरण्याचे उद्योग हे अनेकजणांचे हातचे उद्योग आहेत. अशाच पैशात त्यांनी इमले बांधले आहेत. सिंचन घोटाळ्यात सुनील तटकरेंनी कोट्यवधी छापले, असा धडधडीत आरोप करणाऱ्या किरीटने त्यानंतर एकदाही तटकरेंवरील आरोपाचा पाठपुरावा केला नाही. तेव्हा या दोघांमध्ये झालेल्या डीलच्या खमंग चर्चाही आश्चर्यचकित करायच्या. छगन भुजबळ यांना अडीच वर्षांचा तुरुंगवास झेलल्यानंतर निर्दोषत्व मिळालं. ज्याने हे घडवलं त्यात किरीटचाच वाटा होता. रायगड जिल्ह्यातील कोईली गावात खरेदी केलेल्या जमिनीवरील सोळा कथित बंगल्यांचं प्रकरण म्हणजे किरीटच्या खोटेपणाची उघड साक्ष होय. विक्रांतच्या बचावार्थ काढलेल्या निधीत किती जमा झाले याची माहिती लपवणाऱ्या किरीटने ते पैसे राज्यपालांकडे जमा केल्याचं ठोकून दिलं. पण तिथेही पैसे जमा झाले नाहीत. तरीही किरीटवरील आरोप मागे घेण्यात आले. सोशल मिडियाने तर किरीटविरोधात मोहिमच उभारल्याचं दिसतं होतं. तरीही ना किरीट स्वस्त बसला ना भाजपच्या नेत्यांनी त्याला रोखलं.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून तर किरीटच्या आरोपांना धारच चढली होती. कोरोनाच्या संकटात घेण्यात आलेल्या तात्कालिक निर्णयातील अनियमितपणाचा गैरफायदा घेत त्याने मुंबई महानगरपालिका आणि पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर इतके आरोप केले की माणसाच्या मरणाचंही त्यांनी राजकारण केलं. भ्रष्टाचाराची चौकशी ही केवळ मुंबई महानगरपालिकेचीच होणार असेल तर यामागच्या हेतूविषयी शंका व्यक्त होणारच. किरीटने मागणी केली म्हणून चौकशी आणि इतरांच्या मागणीला किंमत न देणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या कृतीने किरीट शेफारला. त्याने केलेले आरोप सर्वांनाच खरे वाटू लागले. त्याच्या लेखी लबाड समीर वानखेडे खरा ठरला, मुंबईचा लुटारू परमवीर सिंग, त्याचा साथीदार सचिन वाझे योग्य ठरला. तटकरेंपासून, भुजबळांपर्यंत आणि वानखेडेंपासून वाझेपर्यंतची ही सगळी माणसं आज सत्तेसाठी किरीटच्या पक्षाला जाऊन मिळालेली आहेत. पण त्यातल्या एकानेही किरीटची बाजू घेतलेली नाही, हा किरीटच्या मागचा दुर्विलासच म्हटला पाहिजे.
अश्लील सीडी उजेडात आल्यानंतर किरीटवर होऊ लागलेल्या आरोपांची आता भाजपकडे असलेल्या गृह खात्याकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून फारसं काही बाहेर येईल, यावर कोणाचा विश्वास नाही. फडणवीसांकडील गृह खात्याने याआधीही आपल्याच पक्षातील अनेकांच्या चौकशा केल्या आणि त्यात त्यांना क्लिनचिटही देऊन टाकल्या. तेव्हा किरीटवरील आरोपातून सध्याच्या गृह खात्याकडून फारसा शोध होईल, यावर कोणाचा भरवसा नाही. सामान्यत: भ्रष्टाचाराचे आरोप करून किरीट यांनी कमाई केल्याच्या असंख्य चर्चा सातत्याने होत आल्या. नेत्यांना ईडी आणि सीबीआय चौकशीची भीती घालायची आणि कमाई करायची हे उद्योग सर्रास सुरू होतेच. यात एकट्या किरीटचे खिसे भरले हे म्हणणं जोखमीचं होईल. ही चर्चा इतक्यावरच थांबली असं नाही. अनेक अधिकाऱ्यांनाही भीती घालून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचं दबत्या आवाजात बोललं जातं. ज्याने या किल्प्स बाहेर काढल्या त्याला किरीट याच्या कारनाम्याने हैराण केलं असेल हे उघड आहे. खासगी जीवनात असं कृत्य दुर्लक्षावं, असं आता किरीटची बाजू घेणारे सांगू लागले आहेत. यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडही आहेत. त्यांनी याबाबत एकदा अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करावी. किरीटच्या खोटेपणाचे भोग काय होते, हे देशमुखच सांगू शकतील. याच खासगी जीवनाचा अधिकार इतरांनाही असतो, हे किरीटने लक्षात घेतलं नाही. आता आरोप झाल्यावर आपण कोणावर अत्याचार केला नाही, असं सांगणाऱ्याला अत्याचार केल्याशिवाय असल्या क्लिप्स बाहेर येऊ शकत नाहीत, हे लक्षात कसं येत नाही? पैशांची हाव आणि सत्तेची हाव ही माणसाला अशीच वाह्यातपणात ढकलत असते. असा वाह्यातपणा करणाऱ्या अनेकांना भाजपने पोसलंय. त्यांना भ्रष्टमुक्त करून घेतलं. महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकण्यासाठी अघोरी मार्ग अनुसरले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अस्तित्वावरच घाला घालण्यात आला. याने भारतीय जनता पक्षाची आधीच नाचक्की झाली असून यात आता किरीटच्या वाह्यातपणाची भर पडली आहे. हा वाह्यातपणा असाच सुरू ठेवला तर आगामी काळात भाजप हा बेदखल पक्ष होईल, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. तेव्हा अशा व्यक्तींना पक्षाच्या राजकरणात किती स्थान द्यायचं याचं भान पक्षाच्या नेत्यांना राखावं लागेल...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai