Breaking News
माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांचे नुकतेच मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकात पुण्यातील एका प्रकरणात मोक्याचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डाव आपण कसा उधळून लावला, हे त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या या प्रकाशनामुळे पवार कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा त्यांचा हेतू तर नाही ना अशी शंका येते. पुस्तक प्रकाशनाची त्यांची वेळ फारच मार्मिक असून त्यांचे पत्रकार परिषदेतील बासरीचे सूरही कर्कश असल्याचा अनुभव यामधून येत आहे. सेवेत असताना ते प्रवाहाच्या विरुद्ध जावून निर्णय घेत असल्याचे कधीच दिसत नाही. परंतु, निवृत्त झालेले अधिकारी निवृत्ती नंतर मात्र विश्वामित्री पवित्र घेऊन “तो मी नव्हेच” मधील लखोबा लोखंडेचा बुरखा पांघरतात आणि समाजाचे प्रबोधन करण्याच्या नावाखाली आपल्या अनुभवाची शिदोरी पुस्तक रूपाने प्रसिद्ध करतात. अशाच माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकरांच्या अनुभवाच्या शिदोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय धुळवड उडाली आहे. राजकीय नेते, बिल्डर आणि भूमाफियांच्या संबंधांवर त्यांनी पत्रकार परिषदेत टाकलेला कटाक्ष जरी बोलका असला तरी त्यांच्या ह्या कटाक्षातून नोकरशाही कशी सूटली हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.
गुन्हेगारांची कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या पोलिस महासंचालक बोरवणकर यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. सेवानिवृत्तीनंतर लिहिलेल्या पुस्तकातील अजित पवार यांच्यासंबंधीच्या आरोपामुळे आता काहूर उठले आहे. शरद पवार यांच्यावर शिवसेनेत असताना ‘भूखंडाचे श्रीखंड ओरपल्याचा' आरोप करणाऱ्या छगन भुजबळांना नंतर महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणामध्ये गजाआड जावे लागले. या आरोपांची राळ उठवून राज्यात परिवर्तन यात्रा काढणाऱ्या गोपीनाथ मुंडेंनी नंतर सत्ता आल्यावर पवारांवर काय कारवाई केली याबाबत महाराष्ट्र अजूनही अनभिज्ञ आहे. बदनामीतून सत्ता मिळवण्याची एकदा चटक राजकर्त्यांना लागली कि काय घडते याचे प्रत्यंतर देशाने 2014 मध्ये अनुभवले आहे. ज्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा उल्लेख मीराबाईनी आपल्या पुस्तकात केला त्याचा ढोल भाजपने देशात बडव बडव बडवला आणि देशात 2024 मध्ये सत्ता मिळवली. पण त्याही घोटाळ्यातील सर्व आरोपी मोदी सरकारच्या काळात निर्दोष सुटले हेही तितकेच खरे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मीरा बोरवणकरांनी वाजवलेल्या बासुरीचे मंजुळ स्वर हे त्यांचेच आहेत कि बासुरीत भरलेली हवा दुसऱ्या कोणाची आहे याचा विचार करण्याची वेळ आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा कोणत्याच पक्षाचे नेते भूखंड गैरव्यवहाराच्या आरोपापासून मुक्त राहिले नाहीत. गेल्या दोन वर्षांमध्ये संजय राऊत, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, एकनाथ खडसे, अनिल परब, नारायण राणे, प्रफुल्ल पटेल, सुभाष देसाई अशा अनेक नेत्यांची नावे या ना त्या कारणाने भुखंड वितरणात, जमिनीचा वापर बदल करण्यात गाजत आहेत. बिल्डर्स आणि राजकारण्यांचे मधुर संबंध, त्यातून शहरांच्या हद्दीतील आरक्षणे उठवून मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात कशा घातल्या गेल्या, त्याचे फायदे राजकारण्यांनी कसे उठवले, याच्या सुरस कथा वारंवार ऐकवल्या जातात. पण हे सर्व प्रशासकीय अधिकारांच्या सहमती शिवाय शक्य नसते हेही तितकेच खरे. राजकर्त्यांचे खरे मार्गदर्शक हे प्रशासकीय अधिकारीच असतात आणि याच साठगाठीतून मग भ्रष्टाचाराची मालिकाच उभी राहते. आज नोकरीत मोक्याच्या जागा मिळाव्या म्हणून कोट्यावधी रुपयांची शिदोरी देणारे नोकरशहा मग हा पैसा त्याच मार्गाने वसूल करणार हेही तितकेच खरे. मग या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीवर बोरवणकरांच्या बासुरीतुन मंजुळ ध्वनी कधी बाहेर पडतील याच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र आहे.
ज्या पोलीस खात्यात बोरवणकरांनी उभी हयात घालवली त्यात आमूलाग्र बदल सुचवण्याच्या अपेक्षा त्यांच्याकडून समाजाला आहेत. पोलीस खात्यात राजरोस सुरु असलेला भ्रष्टाचार, त्यांचे गुन्हेगारांशी असलेलं साठेलोटे याबाबत त्यांनी निवृत्तीनंतर काम करणे अपेक्षित आहे. गुन्हेगारी रोखण्यास आणि गुन्हेगारीपासून तरुणांना परावृत्त करण्यास त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. पोलीस दलातील भ्रष्टाचार कसा कमी होईल यावर त्यांनी सरकारला मार्गदर्शन करायला हवे. पण इथे मात्र वेगळेच अनुभवायला मिळत आहे. मुंबई, ठाणे व पनवेल लगत सुरु असलेले डान्स बार, बार आणि रेस्टॉरंट मध्ये असलेली गुंतवणूक कोणत्या अधिकाऱ्यांची आहे याचा शोध त्यांनी घेतल्यास बोरवणकरांना आपल्याच वर्दीतील भाऊबंद सापडतील. नवी मुंबईत अमली पदार्थ विक्रेत्यांकडून माया घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलालाच व्यसन लागल्यावर मग मात्र कारवाई सुरु झाली हे कटू सत्य आहे. बोरवणकरांचे आरोप म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही हा असला प्रकार म्हणावा लागेल. बोरवणकरांनी असल्या आरोपांच्या मागे न लागता जर ठोस सुधारणा सुचवल्या असत्या तर ते त्यांच्या प्रतिभेला आणि प्रतिमेला शोभून दिसले असते. पण एवढ्या उच्य विभूषित अधिकाऱ्याने शेवटी सर्वसाधारण प्रसिद्धीचा सवंग मार्ग का स्वीकारला याच्या मागचे कारण शोधणे गरजेचे आहे.
बोरवणकरांच्या पुस्तक प्रकाशनाचा टायमिंग आणि त्यातील मजकूर हे खूप काही सांगून जाते. 10-15 वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींवर निवृत्तीनंतर आताच भाष्य करणे ही सहज प्रक्रिया नाही. भाष्य केले ते पण पुण्यातील भूखंड प्रकरण आणि प्रामुख्याने पवार कुटुंबावर तेही दिल्लीत. जरी अजित पवारांना लक्ष केले असले तरी प्रमुख टार्गेट शरद पवार आहेत हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. “भूखंडाचे श्रीखंड” हा वाक्प्रचार पवार कुटुंबाशी भाजपने असा जोडला आहे कि त्यांच्या नंतरही महाराष्ट्रात तो अनेकवर्ष चर्चिला जाईल. यावेळीही या आरोपांचे राजकारण करण्यात येईल हे निश्चित. शरद पवारांनी बांधलेली ‘इंडिया' ची मोट भाजपाला 2024 च्या मध्यवर्ती निवडणुकीत चांगलीच जड जाणार अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षात शरद पवारांवर कोणतेही शरसंधान करू न शकल्याने भाजप अस्वस्थ आहे. महाराष्ट्रातून भाजपाला 12 जागांपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा अंदाज आल्याने भाजप या आरोपांना नक्कीच हवा देणार आणि बोरावणकरांची त्यास अप्रत्यक्ष साथ मिळेल.
नेमके अजित पवार यांनाच का लक्ष केले हेही पाहावे लागेल. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री हे आता औटघटकेचे आहे हे सर्वश्रुत असून सर्वोच्च न्यायालय 30 ऑक्टोबरला कोणता निर्णय देते यावर ते अवलंबून आहे. शिंदेंनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असे जरी बोलले जात असले तरी त्यांना भाजप मुख्यमंत्री करण्याचा धोका पत्करणार नाही हे तेवढेच खरं. अजित दादांना पाच वर्ष मुख्यमंत्री करू असे फडणवीस म्हणत आहेत याचाच अर्थ पुढील सत्ता आली तरच दादांना चान्स मिळेल. उपमुख्यमंत्री झाल्यावर दादांनी दाखवलेले प्रताप आणि केलेली लुडबुड फडणवीसांना आवडली नसून त्यांच्यावर या आरोपांच्या माध्यमातून अंकुश घालण्याचा प्रयत्न होईल आणि त्यातून जर दादा ऐकले नाही तर राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा राहील. परंतु हे सर्व 3 डिसेंबरला पाच राज्यांच्या निकालावर अवलंबून असेल. त्यामुळे दादांना वेसण घालण्यासाठी व शरद पवारांना रोखणे हा या खेळीमागचा उद्देश तर नाही ना. अण्णा हजारे आंदोलनातून काँग्रेस पक्षावर आरोप करणारे जनरल व्ही.के.सिंग, किरण बेदी, अरविंद केजरीवाल आता कुठे आहेत याचा शोध घेतल्यास बोरवणकरांच्या आरोपामागील तीच रणनीती नाही ना अशी शंका येते. त्यामुळे “बोरवणकर तुम्ही सुद्धा” हे सीझर चे शब्द आठवतात...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे