Breaking News
रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ; घारापुरीवरही एकदाच पाणीपुरवठा
उरण : उरण तालुक्यातील 25 ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे. तर पुर्व विभागातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातही पाणीसाठा आटल्याने उरण परिसरातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भिषण होत असल्याने उरणसह घारापुरी बेटावरील रहिवाशी पावसाळ्याची वाट पाहत आहेत.
उरण परिसरातील 25 ग्रामपंचायती आणि औद्योगिक प्रकल्पास सुमारे दोन लाख लोकसंख्येला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. अपुऱ्या पावसामुळे यावर्षी रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे. तसेच उरण परिसरातील अनेक गावातील विहीरी, तलाव यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उरण परिसरातील 25 ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने मागील सहा महिन्यांपासूनच मंगळवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस पाणीकपात लागू केली आहे. त्यानंतरही आठवड्यातील पाच दिवस शहरवासीयांना फक्त दिवसात एकच तास पाणी दिले जाते. नियोजनाचा अभाव आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे पाणीटंचाईची समस्या शहरवासीयांना याआधीही भेडसावत होती. त्यातच उष्णतेचा पारा चढा असल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामानाने उरण नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांच्या आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होत नाही. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुनाडे धरणातून मागील अनेक वर्षांपासून पुनाडे, वशेणी, सारडे, कडापे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, पाणदिवे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र 35 वर्ष जुन्या धरणाला सातत्याने लागलेली गळती दूर करण्यासाठी आणि साचलेला गाळ काढण्यात शासकीय विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पुनाडे धरण पुर्णता गाळाने भरल्याने या 9 गावातील 20 हजार नागरिकांना सध्या पाणी टंचाईने ग्रासले आहे. याआधी प्रत्येक गावात एक दिवस आड तासभर पाणी सोडण्यात येत होते. मात्र पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आता तीन दिवसांआड एकदिवस एक तास पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जगप्रसिध्द घारापुरी बेटावरही राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर या तीन गावांना पाणीपुरवठा करणारे धरण डिसेंबरमध्येच आटल्याने पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. बेटवासियांना समुद्रमार्गे होडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे केली आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या मागणीनंतरही शासकीय यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे घारापुरी बेट पाण्याचे दुर्भिक्ष बनले असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा निधीतून मुंबईतील पीरपाव बंदरातून होडीतून टाक्या भरून पाणी आणून बेटवासियांना पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.
रानसई धरणाची पाणीपातळी खालावली असल्याने दररोज सिडकोच्या हेटवणे धरणातून चार एमएलडी पाणी उसणे घेऊन नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहोत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उरणमध्ये यापुर्वीच दोन दिवस पाणी कपातही लागू केली आहे. नागरिकांनीही जुन महिना अथवा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने व जपुन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai