Breaking News
उरण : बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा व्यवहार यापूर्वी उरणमधील मोरा रोडवरील दशाश्री माळी कॉप्लेक्समध्ये सुरू होता. गेल्या सहा महिन्यांपासून ही शाखा शहरातील आनंद नगर येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. 15 ते 20 वर्षांपूर्वी या शाखेमधे 15 ते 20 कर्मचारी कार्यरत होते; परंतु आता तेथे फक्त पाच कर्मचारी काम करीत आहेत. कमी कर्मचाऱ्यांमुळे बँकेच्या खातेधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उरण शहरातील आनंदनगर येथील बँकेत, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही गेल्या कित्तेक वर्षापासुन नफ्यामधे असुन बँकेतर्फे कित्तेक करोडो रूपयांचा नफ्याची रक्कम केंद्र सरकारला देत आली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये अनेक कर्मचारी निवृत्त होऊन सुद्धा बँकेने त्यांचे ठिकाणी नवीन भरती केलेली नाही. त्या करता आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी 2 ते 3 वेळा संप करून सुद्धा महाराष्ट्र बँकेने नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. त्यामुळेच वरील सर्व अडचणी ग्राहकांना सोसाव्या लागत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ही उरण मधील सर्वात जुनी बँक असुन तेथे मोठया प्रमाणात खातेदारांची संख्या आहेत. या सर्व अडचणीमुळे अनेक खातेदार आपली खाती इतर बँकेत हस्तांतरीत करण्याच्या तयारीत आहेत. गर्दीच्या वेळी शाखेमध्ये उभे राहण्यासाठीसुद्धा जागा नसते. सर्व कामांसाठी केवळ एकच कांऊटर उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच रांगेमध्ये अर्धा ते पाऊण तास रखडत उभे रहावे लागते. त्यांना तेथे बसण्याचीसुद्धा सोय उपलब्ध केलेली नाही. बँकेने लावलेल्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवस रक्कमच उपलब्ध नसते. त्यामुळे ग्राहकांना बाहेरील बँकांच्या एटीएमकडे धाव घ्यावी लागते व त्यांना त्याकरिता फुकटचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
मी गेल्या 32 वर्षांपासून महाराष्ट्र बँकेचा ग्राहक आहे. आनंदनगर येथील बँकेत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या पाहता, मी झोनल कार्यालय बँक ऑफ महाराष्ट्र सिडको, जुने वाशी तसेच महाव्यवस्थापकांशी पत्रव्यवहारदेखील केला आहे. - ॲड. दत्तात्रय नवाळे, खातेदार
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai