Breaking News
उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी
उरण ः उरण तालुक्यात सिडको व इतर शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जने कब्जा केला आहे. होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. मात्र यावर शासकीय यंत्रणेकडून आर्थिक साटेलोटामुळे कारवाई होत नाही. या घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेला तर कित्येकजण जखमी झाले आहेत. तरी उरण तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग्जवर ठोस कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120 बाय 120 फुटाचं होर्डिंग कोसळल्याने तब्बल 14 जणांचा हकनाक जीव गेला. मुंबईसह राज्यात सर्वत्र होर्डिंगचं जाळं पसरलेलं दिसत आहे. 120 टन वजनाचं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने 100 दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी दि. 18 एप्रिल 2023 रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात होर्डिंग पडून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. मुळातच व्यावसायिक हेतूने उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंग्जचा दर्जा व मजबुतीची अधूनमधून स्ट्रक्चरल ऑडीट होणे आवश्यक आहे. जिथे अनधिकृत होर्डिंग्ज असतील तिथे कारवाई होणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचे उरण परिसरात मोठमोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक अनधिकृत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने वारंवार करूनही सिडको व इतर शासकीय यंत्रणा याकडे आर्थिक हितसबंधामुळे दुर्लक्ष करीत आहेत. तरी घाटकोपर दुर्घटनेची दखल घेऊन त्वरित उरण मधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सिडको प्रशासनाकडे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai