बदलते हवामान, जीवनशैलीचा खाडी किनाऱ्यावर परिणाम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2024
- 392
उरण ः अरबी समुद्राच्या खाडीचे सानिध्य लाभलेला उरण तालुक्यातील जवळपास पाच हजार लोकवस्तीचा गाव म्हणजे वशेणी गाव.अरबी समुद्राचे करंजा बंदर मार्गे पाताळ गंगा नदी पर्यत पाणी घुसते.याच पाताळ गंगा खाडीत वशेणी दादर हा समुद्राचा खाडी किनारा येतो. बदलत्या हवामान व लोक जीवनशैलीचा या खाडी किनाऱ्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नुकताच वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा समुद्र किनाऱ्याचा अभ्यास दौरा केला.
या अभ्यास दौऱ्याची सुरूवात समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जलपूजेने करण्यात आली. या वेळेस समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आला. खाडी किनारा,कांदळवने,खाजनाची जागा,समुद्री जीव यांचे निरीक्षण आणि तौलनिक अभ्यास देखील करण्यात आला. या तौलनिक अभ्यासातून गेल्या 20-25 वर्षापूर्वीच्या समुद्र किनारा आणि आताचा समुद्र किनारा यामध्ये खूपच बदल झालेला दिसून आला. बदलत्या हवामाना नुसार या किनाऱ्यावरील भालखुबे, शंकखुबे, आंग्रे, कांदिरवाल, तायतुपय, या सारखे समुद्रीय जीव दुर्मीळ झाल्याचे दिसून आले. तर खाजनाच्या जागेत चिखलावर मौज मजा करणारा निवटी मासा, पालका यांचे प्रमाण देखील खूपच कमी झाले आहे. बदलत्या लोकजीवन शैलीमुळे कांदळवनाची योग्य देखभाल न झाल्याने खाडी किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होताना दिसत आहे. परिणामी बांध फुटून समुद्राचे पाणी शेती क्षेत्रात घुसण्याची संभावना दिसून येते. वशेणी दादर पूल आणि खाडी परीसरात येणारे पर्यटक व मद्यप्रेमी यांच्यामुळे काचेच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कागद यांचे साम्राज्य किनाऱ्यावर दिसून येते. या बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर जगणारी खाण्यालायक उपलब्ध असणारी भरपूर प्रमाणात आयोडीन देणारी वनस्पती म्हणजे डावला. पूर्वी डावला ही वनस्पती भाजीत, डाळीत, मच्छीत किंवा पातोळा बनवून खाल्ली जात होती. मात्र आधुनिक जीवनशैलीत या भाजीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी डावला भाजी आहारात वापरावी असे आवाहन या वेळेस मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.या अभ्यास दौऱ्यात पुरूषोत्तम पाटील, किशोर म्हात्रे, बी.जे.म्हात्रे, हरिश्चंद्र ठाकूर, सतिश पाटील, कैलास पाटील, अनंत पाटील, सुनिल तांडेल, हरेश्वर पाटील इत्यादी मंडळाचे सदस्य सहभागी होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai