पुन्हा लाल किल्ल्यावरून...
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 17, 2024
- 435
लाल किल्ला आणि एखाद्याला डोळे लाल-लाल करून दाखवणे यांचा मोदींशी खूप जवळचा संबंध आहे. भारताने नुकताच 78 वा स्वतंत्रता दिवस साजरा केला. लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा मोदींनी देशाला संबोधित केले. लागोपाठ अकराव्यांदा त्यांनी देशाला संबोधून नेहरुच्या रांगेत जाण्याचा मान मिळवला. शेवटी काय तर नेहरू मोदींच्या पाचवीला पूजलेलेच. इथेही त्यांनी केलेल्या विक्रमाची तुलना अखेर नेहरूंबरोबर झाल्याने त्यांना ते पचलेले नसेल. निवडणुकीत बहुमत न मिळाल्यामुळे चेहऱ्यावरची रया गमावलेले मोदी देशाला काय संदेश देतील याकडे संपूर्ण भारत वासियांचे लक्ष लागले होते. पण, लोकसभा निवडणूक संपली आणि आपण पंतप्रधान झालो यावर त्यांचा विश्वास बसलेला दिसत नाही. त्यांनी केलेले भाषण हे निवडणुकीतील भाषणासारखे होते इथे खेदपूर्वक नमूद करावे लागते. देशातील अनेक विषयांना त्यांनी हात घातला पण लाल किल्ल्यावरून बोलताना पुन्हा विरोधकांना टार्गेट केल्याने त्यांनी आपल्या पदाची गरिमा पणाला लावली.
मोदींनी देशाला सेक्युलर नागरी संहितेची गरज असल्याचे यावेळी सांगितले. सर्व प्रथम मोदींना सेक्युलर या शब्दाबद्दल आपुलकी वाटली यासाठी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देणे गरजेचे आहे. बहुमत मिळाले नाही तर काही काळ का होईना धर्मनिरपेक्षतेची शाल पांघरावी हे मोदींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीने पटवून दिले हेच या निवडणुकीचे वैशिष्ट आहे. देशाच्या 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे घटनेच्या प्रस्तावनेत भारत सरकारने धर्मनिरपेक्षता हा शब्द अंतर्भूत केला. धर्मनिरपेक्षता या शब्दास त्यावेळी अनेक पक्षांनी विरोध केला त्यामध्ये प्रामुख्याने मोदी ज्यापक्षाचे नेतृत्व करतात त्याचा प्रामुख्याने समावेश होईल. भारताने सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्षता अंगिकारली असून देशातील काही लोकांच्या ती पचनी पडलेली नाही. भारत हा विविधतेने नटलेला खंडप्राय देश असल्याने तो धर्मनिरपेक्ष या तत्वानेच अखंड राहू शकतो हे तेव्हाच्या राजकर्त्यांनी ओळखून त्याप्रमाणे देशात राजकारण केले. देशात बहुजन जरी हिंदू असले तरी अल्पसंख्यांक मोठ्या संख्येने असल्याने त्यात्या वेळच्या सरकारने टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारला आणि देशाची घडी अबाधित ठेवली.
ज्या सरकारवर मुस्लिमांचे तुष्टीकरणाचा आरोप सदैव मोदींच्या पक्षाने लावला त्याच सरकारने धर्माच्या आधारावर निर्मित पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केले, एव्हढेच नाही पाकिस्तानचे दोन तुकडेही केले. काँग्रेस सरकारने मतांच्या लालसेपोटी अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन केले असेल पण सत्तेसाठी धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचा मार्ग कधीही स्वीकारला नाही. धर्माच्या मार्गावरून सत्ता मिळवणे कायम धोकादायक असते. ज्या देशांनी धर्मावर आधारित राजसत्ता प्रस्तापित केली त्यांचे पुढे काय झाले हे इतिहासाच्या पानांवरुन दिसेल. पण आपले राजकीय पूर्वज हे कमालीचे ध्रष्टे होते. धर्माच्या आधारावर जरी देशाची फाळणी झाली असली तरी त्यांनी कट्टर धर्मवाद न स्वीकारता धर्मनिरपेक्षतेची बीजे रोवली आणि देशात लोकशाही रुजवली. या उलट ज्यांनी द्विराष्ट्राची संकल्पना मांडली ती मंडळीं द्विराष्ट्र निर्मिती नंतर अखंड भारताचे स्वप्न भारतीयांना दाखवून सत्तेचा सोपान मागत आहेत. बरे मग गेली दहावर्षे सत्तेत असून अखंड भारतासाठी काय केले हा प्रश्न आवश्यक ठरतो.
लाल किल्ल्यावरून बोलताना मोदींनी अनेक विषयांना हात घातला. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये घडलेली बलात्काराची घटना, देशातील वाढता भ्रष्टाचार, बंगालमध्ये झालेले सत्तांतर आणि हिंदूंवरील हल्ले आणि 2047 पर्यंतचा विकसित भारत हे बोलत असताना ते मागील सरकार कसे निष्क्रिय होते हेही सांगायला विसरले नाहीत. खरंतर स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना निदान त्यावेळी तरी राजकीय भाष्य टाळणे गरजेचं असते. पण, सदैव प्रचारकीची धुरा सांभाळलेले मोदी आपल्या मूळ रूपातून बाहेर यायलाच तयार नाहीत. देशाने साधलेला विकास आणि भविष्यातील देशाची ध्येयधोरणे याबाबत देशवासियांना ऐकायचे असते पण साहेब राजकीय कोटी करण्यातच समाधान मानतात हे देशाचं दुर्दैव. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला, पण ते उनाव, हातरस, महिला कुस्तीवरचा टाहो विसरले. एव्हढच नव्हे तर मणिपूर मधील महिलांच्या काढलेल्या धिंडबाबत आजही मौन आहेत. देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त करत असताना ज्या पक्षावर सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला त्याच पक्षाचा नेता भाजपात येतो आणि उपमुख्यमंत्री बनतो याबद्दल पण व्यक्त झाले असते तर तुमच्या बोलण्याला अर्थ होता. गेल्या दहा वर्षात मोदींनी केलेल्या घोषणा आणि त्याची फलप्राप्ती याबाबत जनता आता अवगत आहे. त्यामुळे तर 400 पार चा नारा देणाऱ्या मोदींचे विमान जनतेनेच खाली उतरवले.
सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी चीनला लाल-लाल डोळे दाखवण्याचा वादा देशातील जनतेला केला होता. पण चीनने केलेल्या घुसपट्टीनंतर त्यांच्यावरच न कोई घुसा है म्हणण्याची वेळ आली. नुकतेच चीनने भारतीय सीमेत गावे कशी वसवली याचे फोटो सिद्ध झाले. पण, लाल-लाल डोळे करण्याची गोष्ट दूर साधा निषेद करण्याचे धारिष्ट्यहि दाखवू नये यातच सगळे आले. पुन्हा एकदा ‘एक देश एक निवडणूक' या धोरणाचा उल्लेख केला. त्याऐवजी देशातील बेरोजगारी, सामाजिक आणि आर्थिक विषमता यावर बोलून ते दूर करण्यासाठी सरकार कसे प्रतिबद्ध आहे हे सांगितले असते तरी खूप होते. पण, जमिनीस्तरावरील सत्यापासून कोसो दूर असणाऱ्या राजाला हे सत्य भाट नजरेस आणतील तर शपथ. ज्याच्या कथनी आणि करणीत एकवाक्यता नसते त्यावर जनता विश्वास ठेवत नाही. पण, मोदींवर लोकांचा विश्वास कमी झाल्याचे लोकसभा निकालावरून दिसते. येत्या चार महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, बिहार या राज्यात निवडणूका आहेत. त्या राज्यातील निकाल मोदी सरकारचे म्हणण्यापेक्षा मोदींचे भवितव्य ठरवणार आहेत. मोदींनी प्रथमच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेचा पुरस्कार केला. उशिरा का होईना मोदींना धर्मनिरपेक्षतेचे महत्व पटले पण आता त्यास उशिर झाला असे म्हटल्यास वावगे ठरु नये. लोकसभा निकालानंतर मोदी-शहांना प्रथमच पक्षातूनही विरोध जाणवू लागला आहे. वरील राज्यातील निकाल हे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर आतापर्यंत विरोधकांना लाल-लाल डोळे दाखवणाऱ्या मोदींचे हे कदाचित लाल किल्ल्याच्या प्राचीवरील शेवटचे संबोधन ठरले नाही म्हणजे मिळवले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai