2 ऑक्टोबरला वाशीत रंगणार बालकलाकार

नवी मुंबई ः समाजातील गरजू व वंचित मुलांना इतर मुलांप्रमाणे समाजप्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांचा विकास  होण्यासाठी तसेच त्यांनाही चांगले शिक्षण मिळण्यासाठी एआईएसईसी या युवकांच्या समाजसेवी संघटनेने पुढाकार घेतला आहे. या युवकांनी नवी मुंबईतील 600 वंचित मुलांसाठी 2 ऑक्टोबरला ‘बालकलाकार’ या कार्यक्रमाचे वाशी सेक्टर 7 येथील मॉर्डन स्कूलमध्ये आयोजन केले आहे.

युनाटेड नॅशन्स आणि यूएनईएससीओच्या बरोबर सलग्न असलेली एआईएसई ही युवकांची संघटना गेल्या अनेक वर्षांपासून देशात विविध ठिकाणी तसेच भारताबाहेरी 127 देशामध्ये कार्यरत आहे. विविध कार्यक्रमाद्वारे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ही तरुणाई काम करत आहे. असाच एक कार्यक्रम त्यांनी 2 ऑक्टोबरला नवी मुंबईत आयोजित केला आहे. नवी मुंबईतील 20 एनजीओ, आदिवासी पाडे यातील 5 ते 16 वर्ष वयोगटातील 600 गरजू व वंचित विद्यार्थ्यांसाठी ‘बालकलाकार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थ्यांंना नृत्य, नाटक, चित्रकला स्पर्धा, बुद्धिमत्ता चाचणी, गायन या स्पर्धांच्या माध्यमातून  त्यांना त्यांच्यातील कला व कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ दिले जाणार आहे. तसेच यातून 10 विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना एआईएसईसीमार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.