इंदोरच्या अभ्यासगटाकडून नवी मुंबईच्या नाविन्यपूर्णतेची प्रशंसा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 23, 2025
- 19
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत काही वर्षांपासून देशात सातत्याने पहिल्या 3 क्रमांकामध्ये अग्रभागी असणाऱ्या 4 शहरांची ‘सुपर स्वच्छ लीग’ ही एक विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आलेली असून त्यामध्ये नवी मुंबईसह मानांकित असणाऱ्या ‘इंदोर महापालिकेतील अभ्यासगटाने नुकतीच नवी मुंबई महापालिकेस भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली व नवी मुंबईत आधुनिक तंत्रप्रणालीचा अंगिकार करून केल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.
या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात त्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालय वास्तूच्या रचनेचे व तेथील अत्याधुनिक सुविधांचे आणि प्राधान्याने येथील स्वच्छतेचे कौतुक केले. दैनंदिन कचरा संकलन आणि वाहतुक प्रणालीचे नियमित निरीक्षण आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्थापित इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देऊन त्यांनी संपूर्ण प्रणाली जाणून घेतली. कोणते वाहन कुठे आहे, त्याने कोणत्या वेळी कुठल्या कचरापेटीतील कचरा संकलित केला यावर कचऱ्याच्या डब्यावरील मायक्रोचीपव्दारे तसेच वाहनावरील जीपीएस प्रणालीव्दारे नियंत्रण ठेवले जात असल्याची कार्यप्रणाली उत्तम असल्याचे अभिप्राय त्यांनी दिले. केंद्रीय वस्त्र मंत्रालय संचलित वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या वस्त्र कचरा पुनर्प्रक्रिया केंद्राची पाहणी करताना ते प्रभावित झाले. वस्त्र कचरा संकलित करून तो आकर्षक साहित्याच्या रूपाने पुनर्वापरात आणणाऱ्या प्रकल्पाच्या वेगळेपणाचे त्यांनी कौतुक केले. नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये असलेल्या जगातील आठ आश्चर्यांच्या प्रतिकृतींमधून माहिती मिळते व मनोरंजनाच्या साधनांमधून संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र वेळ घालविण्याचे एक उत्तम माध्यम उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानजिक निर्माण होणाऱ्या सायन्स पार्कची त्यांनी माहिती जाणून घेतली व तो पूर्ण झाल्यानंतर भेट देण्यास आवडेल असे सांगितले.
नेरूळ येथील रूग्णालयात सुरू असलेल्या कॅन्सर रजिस्ट्री आणि डायलेसिस केंद्राला भेट देऊन सध्याच्या परिस्थितीत कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महानगरपालिकेने पुढाकार घेत हा अत्यंत महत्वाचा आरोग्य उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. कोपरखैरणे येथील जुनी क्षेपणभूमी बंद करून त्याठिकाणी फुलविलेले निसर्गोद्यान व तेथील मियावाकी शहरी जंगल प्रकल्प अतिशय उल्लेखनीय असल्याचे अभिप्राय त्यांनी दिले. त्याबाजूलाच असलेल्या सी-टेक मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द केलेल्या सांडपाण्यावर अधिकची टर्शिअरी ट्रिटमेंट करून ते पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुह, बांधकामे, उद्याने यासाठी वापरण्यात येत असल्याची व त्यातूनही महानगरपालिकेस उत्पन्न प्राप्त होत असल्याची त्यांनी विशेष नोंद घेतली व या अभिनव उपक्रमाची प्रशंसा केली. ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक पाहून हे देशातील सर्वोत्तम स्मारकांपैकी एक असल्याचे अभिप्राय त्यांनी नोंदविले. नवी मुंबई हे नावाप्रमाणेच नाविन्याचा स्विकार करणारे शहर असून शहरातील स्वच्छता, त्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, त्यामध्ये आधुनिक तंत्रप्रणालीचा केला जात असलेला उपयोग तसेच उल्लेखनीय अशा अभिनव प्रकल्पांच्या माध्यमांतून शहरातील नागरिकांना व बाहेरील पर्यटकांना दिल्या जात असलेल्या सुखसुविधा याचे इंदोर महापालिकेतील अभ्यासगटाने कौतुक केले. नवी मुंबईच्या आतिथ्यशीलतेनेही भारावून गेल्याचे सांगत इंदोर शहराला नक्की भेट द्यावी असे आमंत्रणही त्यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai