शिवसेनेतील गटबाजीचा भाजपला फायदा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 184
नवी मुंबई ः राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आयाराम गयाराम यांची मागणी वाढल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. शिंदेसेना व भाजप पक्षात जाण्याचा कल सध्या सर्वच ईच्छुकांमध्ये दिसून येत असून महाविकास आघाडीची मदार मात्र या दोन्ही पक्षातून नाराज होऊन बाहेर पडणाऱ्या उमेदवारांवर असणार आहे. नवी मुंबईत अनेकांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने त्या पक्षात अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. शिंदे यांनी तातडीची बैठक घेऊन सर्वांना समज दिली असली तरी या गटबाजीचा फायदा नाईकांना होणार असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणुक पॅनल पद्धतीने होत असून एकाचवेळी चार उमेदवारांचे एक पॅनल बनवण्यात आले आहेत. एकंदर 28 पॅनल असून 111 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. ही निवडणुक पाच वर्षाच्या अंतराने होत असल्याने अनेकांनी आपली तयारी गेल्या पाच वर्षापासून केली आहे. दरम्यान, शिवसेना फुटून त्यांचे रुपांतर उबाठा व शिंदेसेनेत झाल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रुपांतर शरद पवार राष्ट्रवादी व राष्ट्रवादी काँग्रेस असे झाल्याने अनेकांना आपले राजकीय भविष्य आजमावण्यासाठी दोन नवीन पक्ष उपलब्ध झाले आहेत. परंतु, सध्या उमेदवारांचा कल शिंदेसेना व भाजपा मधूनच तिकीट मिळवण्याचा असल्याने सर्वांना दोन्ही पक्षात साभार स्विकारले जात आहे.
शिंदेसेनेत अनेकांनी पक्षप्रवेश केल्याने त्यांचा ऐरोली विधानसभा मतदार संघ मजबूत असल्याचे बोलले जाते. मागील नगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेने ऐरोली मतदार संघातून 28 नगरसेवक निवडून आणले होते. परंतु, बेलापुर मतदार संघाने साथ न दिल्याने नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले. बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिंदे यांनी कंबर कसली असून ऐरोली विधानसभा मतदार संघातून 40 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष निश्चित केले आहे. परंतु, ऐरोली मतदार संघात विजय चौगुले व माजी नगरसेवकांचे संबंध चांगले नसल्याने 7 नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शिंदे यांनी सर्वांची समजूत काढून त्यांना सेनेतच राहण्यास सांगितले. निवडणुका जाहीर होताच पुन्हा एकदा हा वाद उफाळुन आला असून शिंदे यांनी पुन्हा तातडीची बैठक घेऊन चौगुले व विरोधकांना समजवण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या एम.के.मढवी यांच्या प्रवेशाने हा वाद आणखी चिघळला असून त्यांनी मढवी यांचे काम करण्यास नकार दिल्याचे सुत्रांकडून कळत आहे. त्याचबरोबर ममित चौगुले व करण मढवी यांच्या आगमनाने शिंदेसेनेचे बंडु केणी हे भाजपाकडून नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे सेनेतील गटबाजी सध्या नाईकांच्या पथ्यावर पडली असून त्यांनी अजून बिनीचे शिलेदार गळाला लागावे म्हणून प्रयत्न चालवले आहेत.
दरम्यान, बेलापुर मतदार संघात आ. मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यात पक्षाने दिलजमाई घडवून आणल्याची चर्चा असून या मतदार संघात तुर्भे, वाशी व बेलापुर प्रभाग वगळता शिंदे सेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. शिंदे सेनेचे मदार ही भाजपातून नाराज होऊन बाहेर पडणाऱ्या उमेदवारांवर असणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे हे ठाणे व कल्याण मध्ये अडकून पडणार असल्याने त्याचाही फायदा भाजपला होणार आहे. सध्यातरी नवी मुंबईत गणेश नाईकांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
- युतीची शक्यता धुसर
केंद्रातून भाजपने महायुतीतच निवडणुकांना सामोरे जावे असे निर्देश आले असले तरी स्थानिक नेतृत्व मात्र मुंबई वगळून इतर महापालिकांत युती करण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईत मुख्य लढत शिंदे आणि नाईक यांच्यात असल्याने तसेच महाविकास आघाडी कमकुवत असल्याने येथे युतीची गरज नसल्याची स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांकडे उमेदवारांचा रतीब असल्याने युती झाल्यास त्याचा फटका पक्षाला बसेल असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यातच गणेश नाईक यांचा स्वभाव पाहता ते शिंदे सेनेस कितपत महत्व देतील हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे निदान नवी मुंबईत तरी युतीची शक्यता धुसर असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai