‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो’ चा धमाका
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 66
नवी मुंबई ः नवी मुंबईतील 300 हून अधिक आघाडीच्या विकासकांचे प्रतिनिधित्व करणारी अग्रगण्य संस्था क्रेडाई-बीएएनएम तर्फे 24 वा नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो-2025 चे शुक्रवारी वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये उद्घाटन झाले. सदर भव्य एक्स्पो 12 ते 15 डिसेंबर सुरु राहणार असून या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विविध विकासकांचे 500 पेक्षा अधिक प्रकल्प मांडण्यात आले आहेत. या वर्षीची प्रॉपर्टी प्रदर्शनाची संकल्पना ‘नवी मुंबई ः भविष्याची धावपट्ट्ी’ अशी असून, शहराच्या जलद परिवर्तनाचा आणि आगामी विकासाच्या दिशेने एक्स्पोची भूमिका अधोरेखित करते.
या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये 20 लाख रुपये ते 20 कोटी रुपयांपर्यंतचे 100 हून अधिक विकासकांचे 500 पेक्षा अधिक प्रकल्प मांडण्यात आले आहेत. निवासी, व्यावसायिक, टाऊनशिप आणि लक्झरी अशा विविध श्रेणींतील प्रकल्पांमुळे घरखरेदीदारांना एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध होणार आहेत. वित्त भागीदारांसाठी स्वतंत्र झोन, कर्ज सुविधा आणि गुंतवणूक मार्गदर्शन यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्घाटन समारंभप्रसंगी नमुंमपा सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, ‘बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान, माजी अध्यक्ष वसंत भद्रा, उपाध्यक्ष ओमप्रकाश छाजेड, सेक्रेटरी जीगर त्रिवेदी, खजिनदार शैलेश पटेल, को-कन्वेनर महेश पटेल, हितेश गामी तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, प्रदर्शनस्थळी प्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, माजी आमदार संदीप नाईक आणि इतर मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. 24 व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे नेतृत्व संयोजक महेश पटेल, सह-संयोजक झुबिन संघोई, हितेश गामी करीत आहेत.
नवी मुंबईतील पायाभूत सुविधांची झपाट्याने होत असलेली वाढ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार असल्याने हे शहर भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर होणारे हे मालमत्ता प्रदर्शन खरेदीदार, गुंतवणूकदार आणि विकासक यांच्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे, अशी माहिती क्रेडाईबीएएनएम चे अध्यक्ष रसिक चौहान यांनी दिली. तसेच शहरातील वाढत्या पुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 डिसेंबर रोजी गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासावरील विशेष चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. ‘वॉक टू वर्क संकल्पनेला बळकटी देणे, आधुनिक शहरी जीवनशैलीला नवी दिशा देणे आणि परिसर अधिक गतिशील बनवण्याचे उद्दिष्ट आहे, असेही चौहान यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रदर्शनाचे टायटल स्पॉन्सरर ईव्ही होम्स कंपनीच्या वतीने प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच विमानाची प्रतिकृती उभारुन त्या माध्यमातून त्यांच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती दिली जात आहे. तर मुख्य स्पॉन्सरर असलेल पॅराडाईज ग्रुपच्या वतीने इजिप्तीयन संस्कृतीचा मिलाफ आखून त्या ठिकाणी त्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांचे सादरीकरण आणि माहिती दिली जात आहे. ईव्ही होम्स, पॅराडाईज ग्रुप, एम्पेरिया ग्रुप, गामी ग्रुप, श्रीजी व्हेंचर्स यांनी प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण प्रकल्पांची अनोख्या पध्दतीने मांडणी केलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai