कुंडेवहाळ, बंबावे गावातील शेतजमीनींचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 200
सिडकोकडून प्रादेशिक उद्यानाच्या आरक्षणाखाली शेतकऱ्यांची पिळवणुक
नवी मुंबई ः सिडको क्षेत्रात जमिनीचा प्रति गुंठा भाव 50 लाख रुपये असताना सिडकोने जाणिवपुर्वक टाकलेल्या प्रादेशिक उद्यान आरक्षणामुळे कुंडेवहाळ व बंबावे येथील शेतजमिनींचा शासकीय भाव प्रति गुंठा 3.50 लाख रु. असल्याने आपली पिळवणुक होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या शेतजमीनींचे पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी सहायक संचालक नगररचना, कोकण भवन यांच्याकडे केली आहे. त्यास शासन कसा प्रतिसाद देते याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.
शासनाने 1970 साली सिडकोची स्थापना करुन रायगड व ठाणे जिल्हातील 95 गावच्या जमिनी नवी मुंबईसाठी आरक्षित केल्या. ज्या जमिनींची गरज तुर्त नाही अशा जमिनींवर प्रारुप विकास आराखड्यात प्रादेशिक उद्यान हे आरक्षण टाकून तेथील शेतजमिनींचा भूवापर गोठवून टाकला. तेथे भू-निर्देशांक 0.1 एवढा असल्याने आणि सिडको या क्षेत्रात बांधकाम परवानगी देत नसल्याने तेथील शेतजमिनी या कवडीमोलाच्या ठरल्या. रायगड जिल्ह्यातील कुंडेवहाळ व बंबावे गावातील 70 एकर जमिनीवर सिडकोने प्रादेशिक उद्यान आरक्षण टाकले असून त्यामुळे तेथील शेतकरी या जमिनींचा वापर करु शकत नाही. सिडकोनेही या जमिनी गेल्या 50 वर्षात संपादित केल्या नाहीत आणि शेतकऱ्यांनाही प्रादेशिक उद्यान आरक्षणाखाली विकसीत करु दिल्या नाहीत.
सिडकोने कुंडेवहाळ व बंबावे गावानजिक असलेल्या शेतजमिनी कवडीमोलाने संपादित करुन त्या विकासकांना कोट्यवधी रुपयांना विकल्या आहेत. कुंडेवहाळ व बंबावे गावचे शेतकरी आमच्या जमिनी सिडको संपादित करेल या आशेवर गेली 50 वर्षे तग धरुन आहेत. सिडकोने कुंडेवहाळ व बंबावे गावानजिक पुष्पकनगर, उलवे व कळंबोली नोड विकसीत केला असून येथील जमिनीचा शासकीय दर प्रति गुंठा 50 लाख रुपये आहे. परंतु, कुंडेवहाळ व बंबावे येथीलशेतजमिनीचा दर मात्र 3.50 लाख रुपये प्रति गुंठा आहे. भविष्यात ही जमिन सिडको संपादित करण्ाार असेल तर सिडकोला फक्त 12 लाख रुपये प्रति गुंठा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा लागेल. ही फसवणुक टाळण्यासाठी कुंडेवहाळ व बंबावे गावच्या शेतकऱ्यांनी सहायक संचालक नगररचना, कोकण भवन यांना लेखी निवेदन देऊन आपल्या जमिनीचा दर नव्याने पुनर्मुल्यांकित करावा अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी आपल्या जमिनीलगत 250 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल उभारत असून 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना दिलेले इरादापत्र, 250 एकर जागेवर सिडको उभारत असलेली स्पोर्टस सिटी तर दुसऱ्या बाजुस 300 एकर जागेवर वाणिज्य भुवापर सिडको विकसीत करत आहे याची दखल जमिनीचे पुनर्मुल्याकंन करताना घ्यावी अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर कुंडेवहाळ व बंबावे या गावच्या शेतजमिनी या वसई-विरार बहुउद्देशीय मार्ग व एनएच48 या राष्ट्रीय महामार्गामध्ये असल्याचेही पुनर्मुल्याकंन करताना विचार करावा अशीही सूचना केली आहे.
सिडकोच्या पुष्पकनगर, दापोली येथील सिडकोचा जमिन विक्रिचा दर 2 लाख रुपये चौ.मी. असल्याने त्याच्या 60 टक्के दर आमच्या जमिनींना पुनर्मुल्याकंन करताना लागू करावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. शासन प्रकल्पग्रस्तांच्या या मागणीची कशाप्रकारे दखल घेते याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागलेआहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai