सेल्फी पॉइंटची नासधुस

नवी मुंबई : पालिकेने लाखो रुपये खर्च करुन शहरात ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट उभारले आहेत. यातील ऐरोली येथील दिवा गाव येथे पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र तोडफोड करण्यामागे राजकीय उद्देशांचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पालिकेच्या वतीने ऐरोली येथील फ्लेमिंगो पार्कच्या समोरच मोकळ्या जागेत हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. त्यामुळे परिसराची शोभा वाढली होती. तर परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणार्‍यांकडून या सेल्फी पॉइंटला पसंदीदेखील मिळत होती. याच उद्देशाने पालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी असे सेल्फी पॉइंट बनविण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी दिवा गाव येथील सेल्फी पॉइंटची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. तिथले पक्के बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहे. यामुळे एखाद्या वाहनाच्या मदतीने ही तोडफोड करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 21 मार्च रोजी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करुन महापालिकेच्या अधिकार्‍यांमार्फत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.