द्रोणागिरीकरांचा प्रवास होणार सुलभ

सिडको करणार मुख्य रस्त्याचे रिसरफेसिंग

नवी मुंबई ः सिडको संचालक मंडळाने, खासगी एजन्सीमार्फत खोपटा पूल ते आयओटीएल, सेक्टर-01, द्रोणागिरी दरम्यानच्या 7.2 कि.मी. लांब व 36 मीटर रुंद मुख्य रस्त्याचे बळकटीकरण/रिसरफेसिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सदर रस्ता हा द्रोणागिरी नोडमधील वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याचे बळकटीकरण केल्यामुळे प्रवाशांना फायदा होण्याबरोबरच जेएनपीटीकडे जाणार्‍या व तेथून येणार्‍या कंटेनरची वाहतूक सुरळीतपणे चालू राहण्यास मदत होणार आहे. या रस्त्याच्या बळकटीकरणामुळे द्रोणागिरी नोडमधील व जवळपासच्या गावांतील रहिवाशांचा प्रवासही सुलभ होणार आहे.

सामान्य प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच जेएनपीटीकडे जाणार्‍या व तेथून येणार्‍या अवजड वाहनांची वाहतूक सुरळीतपणे पार पडावी. या उद्देशाने सिडकोतर्फे द्रोणागिरी नोडमधील मुख्य रस्त्याचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्रोणागिरी नोडमधील रहिवाशांकरिताही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.