पोलिस उपायुक्तांच्या अखेर नियुक्त्या

नवी मुंबई : नवी मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी अखेर आयुक्तालयात बदली होवून आलेल्या पोलिस उपायुक्तांची तसेच आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलिस उपायुक्तांच्या नव्याने फेरनियुक्त्या मंगळवारी केल्या आहेत. 

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे यांची मुख्यालयाच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 1 ऑगस्टला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात हजर झालेले सुनील लोखंडे यांची तत्कालीन पोलिस आयुक्तांनी मुख्यालय उपायुक्तपदी प्रभारी म्हणून केलेल्या नियुक्तीत फेरबदल करुन नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी त्यांची वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच बदली होवून आलेले पंकज डहाणे यांची विशेष शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी आपली नेमणूक व्हावी म्हणून अन्य पोलिस उपायुक्तांमध्ये चढाओढ लागली होती. त्यात सुनील लोखंडे यांनी बाजी मारल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.