शाळेतील मुलींची सुरक्षा ऐरणीवर

नवी मुंबई ः वाशी सेक्टर-15मधील आयसीएल शाळेत चौथीत शिकणार्‍या नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने शाळेतील शौचालयातच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, प्रचंड मानसिक धक्का बसल्याने पीडित मुलीकडून आरोपीबाबत अधिक माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचण येत आहे. या घटनेमुळे शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

वाशी परिसरात राहणारी पीडित मुलगी मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास शाळेच्या मागील गेटने शाळेत जात असताना, अज्ञात व्यक्तीने तिच्या तोंडात रूमाल कोंबून तिला शाळेच्या वॉचमनसाठी असलेल्या बाथरूममध्ये नेले. त्यानंतर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून व तिचे दोन्ही हात पाठीमागे बांधून लैंगिक अत्याचार केला. तसेच या प्रकाराची माहिती कुणाला देऊ नये यासाठी तिला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. सायंकाळी पीडित मुलगी घरी गेल्यानंतर तिने आईला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईने बुधवारी दुपारी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वाशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.