सुनियोजित पार्किंगसाठी सहकार्य करा

पालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

नवी मुंबई ः दिवसेंदिवस भेडसावणार्‍या पार्किंग प्रश्‍नावर तोडगा काढण्यास महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आता प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वाहतुकीबाबत आणि पार्किंगबाबत शिस्त लावण्यासाठी महापालिका कायद्याचा आधार घेऊन कारवाईचा बडगा उगारणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूंनी वाहने पार्क केल्यामुळे तेथील रहदारीला अडथळा होत असल्याच्या तसेच या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला वारंवार प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने दैनंदिन स्वच्छता करतानाही या वाहनांचा अडसर होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांनाही रस्त्यावर पार्किंग केलेल्या या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर अडचण होऊन मदतकार्य करण्यात अडथळा निर्माण होत आहे. यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात एका बाजूने पार्किंग, एकेरी-दुहेरी वाहतूक, ना पार्किंग क्षेत्र अशा विविध प्रकारे पार्किंगचे नियोजन केले असून ठिकठिकाणी ’नो पार्किंग’चे सूचना फलकही लावले आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी मानून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना सातत्याने करण्यात येत आहे. नागरिकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. याशिवाय महापालिका हद्दीमध्ये अनेक बेवारस वाहने रस्त्यांवर पडून आहेत. अशा वाहनांच्या मालकांना महापालिकेने नोटिसाही बजावलेल्या आहेत. यापुढील काळात अशा प्रकारे एकाच जागी बराच काळ उभी असणारी वाहने महापालिका उचलून डम्पिंग ग्राऊंडवर नेणार आहे. बेवारस वाहनांबाबत आरटीओकडून त्यांच्या क्रमांकावरून त्यांचे मालक शोधून त्यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सूचित करण्यात आले. याशिवाय बर्‍याचदा रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कूल बस उभ्या असल्याने कोंडी भर पडेत. ही वाहने योग्य पार्किंग जागेतच उभी करावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत गॅरेजचे काम रस्त्यांवरच सुरू असल्याचे दिसते. त्या ठिकाणी पंक्चरचे पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जातो. गॅरेजचालकांनी वाहन दुरुस्तीसाठी करण्यात येणारा रस्त्याचा वापर त्वरित थांबवावा, अन्यथा त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला. तसेच संबंधितांवर मोटार व्हेइकल कायद्यानुसार गरज भासल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर कोठेही उभी न करता आपल्या मालकीच्या जागेतच उभी करावीत, जेणेकरून वाहतुकीला, रहदारीला, शहर स्वच्छतेला व आपत्ती प्रसंगात वाहनांचा अडथळा होणार नाही. नवी मुंबई हे आपले सुनियोजित शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून नागरिकांनी कोठेही वाहने पार्क करून शहरात बकालपणा येऊ न देण्याची काळजी घ्यावी आणि वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच नागरिकांनाही वाहतुकीबाबत आणि पार्किंगबाबत शिस्त लावण्यासाठी महापालिका कायद्याचा आधार घेऊन कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे ते म्हणाले.