माथाडींच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

नवी मुंबई : 26 फेब्रुवारीला प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कांदा, मसाला व धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तर मुंबई बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. बंदवरून माथाडी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.

राज्यातील माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. माथाडी बोर्डांची पुनर्रचना करण्यात यावी. बोर्डांवर पूर्ण वेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. कर्मचारी भरती करण्यात यावी, घरांसह पतसंस्था, रुग्णालय व इतर प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या मुख्य संघटनेने 26 फेब्रुवारीला राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते.यापूर्वी माथाडी संघटनेने बंद पुकारल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात यायचा; परंतु या वेळी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आंदोलनावरून एकवाक्यता दिसली नाही. यामुळे बंद असूनही भाजी मार्केट सुरळीत सुरू होते. भाजी मार्केटमध्ये 584 वाहनांची आवक झाली असून, 257 वाहनांमधून माल विक्रीसाठी मुंबईत गेला. फळ मार्केटमध्ये 158 वाहनांची आवक झाली व 74 वाहनांमधून माल विक्रीसाठी मुंबईत गेला. फळ मार्केटमध्ये दुपारनंतर व्यवहार बंद करण्यात आले. मसाला, धान्य व कांदा या तीन मार्केटमधील व्यवहार जवळपास ठप्प होते. रेल्वे धक्का व इतर ठिकाणचे व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते. पुणे, नाशिक, सातारा व इतर काही जिल्ह्यांमधील काही मार्केटही बंद ठेवण्यात आली होती.