विमा कवच लागू करण्यास मुदतवाढ

अंतिम तारीख 31 डिसेंबर ; कोव्हिड विषयक कर्तव्यावरील कर्मचार्‍यांच्या मृत्यूप्रकरणी मिळणार सहाय्य

नवी मुंबई : कोविड 19 उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विमा कवच योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत कोव्हिड विषयक कर्तव्यावरील कर्मचार्‍याच्या मृत्यूप्रकरणी सर्व प्रकरणी 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्यात येते. 30 सप्टेंबरला याची मुदत संपणाा होती. मात्र शासन निर्णयानुसार या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आरोग्य सेवा संबंधित कर्मचार्‍यांच्या व्यतिरिक्त अन्य कर्मचारीय (जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले कर्मचारी ) इत्यादी सर्वजण कोव्हिड संबंधित कर्तव्य पार पाडीत आहेत.या कर्मचार्‍यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून अशा कर्मचार्‍यांचा दुदैवी मृत्यू झाला तर त्यांचे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शासनाने विमा कवच योजना लागू केली आहे. कोविड संबंधित सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य आदी प्रकारांची कामे करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मृत्युप्रकरणी 50 लाख रुपये विशेष सानुग्रह साहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी राबविण्याची सूचना शासनाने 29 मे रोजी दिली होती. या योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. राज्यात सद्यस्थितीमध्ये कोविड 19 विषाणूंची साथ सुरू असल्याने, सानुग्रह साहाय्य लागू करण्याबाबतच्या योजनेस पुन्हा मुदतवाढ करण्याची सूचना शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी शासनाने 14 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले आहे. यात 29 मे च्या परिपत्रकातील अटी-शर्थी कायम ठेवायच्या असून, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणार्‍या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी विमा कवच योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.