तुर्भे क्षेपणभुमीची जागा बदलणार

हनुमान नगर वासीयांना दिलासा ः आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश 

नवी मुंबई : झोपडपट्टी धारकांकरिता पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकास योजना लवकरात लवकर राबविल्या जातील  व सदर हनुमान नगर झोपडपट्टी धारकांवर हात लावला जाणार नाही असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना सूचित केले आहे. तुर्भे येथे डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात येणार्‍या भूखंडावरील नागरिकांच्या झोपड्यांना नोटीसांबाबत म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात बैठक संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

नवी मुंबई तुर्भे येथे डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात येणार्‍या भूखंडावर राहत असलेल्या हजारो नागरिकांच्या झोपड्यांना नोटीसांबाबत तसेच पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. तुर्भे रहिवासी यांनी डम्पिंग ग्राउंड इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मागणी केली होती. परंतु सदर ठिकाणी पूर्वी पासून हनुमान नगर वसाहत असल्यामुळे तेथे सुमारे 10 हजार नागरिक राहत आहेत. सदर झोपडपट्टी धारकांना स्थलांतरित करण्याचा विचार करण्याऐवजी तेथील रहिवाश्यांना तिथेच ठेवावे आणि जागा बदलून द्यावी अशी याचिका आ. मंदा म्हात्रे यांनी मांडली आणि या हनुमान नगर वासीयांवर निष्कासित करण्याची कोणतीही कारवाई न करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. सदर घनकचरा व्यवस्थापनाकरिता महसूल विभागाची 34 एकर जमीन पालिकेच्या विस्तारित कचरा भूमीला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सदर जागा देताना शासनाने महसूल व वनविभाग कडून सदर डम्पिंग ग्राउंड करिता मौजे तुर्भे, ता.जि.ठाणे येथील गट नं.376 मधील 18 एकर क्षेत्र, गट नं.377 मधील 3.75 एकर क्षेत्र, गट नं.378 मधील 12.25 एकर क्षेत्र अशा एकूण 34 एकर क्षेत्राचा नवी मुंबई महानगरपालिकेस ताबा देण्याची शासन मान्यता देण्यात आली होती. परंतु सदर जागेवर हनुमान नगर येथील सुमारे 10 हजार नागरिक गेल्या 40 वर्षापासून राहत आहेत. सदर नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी तुर्भे हनुमान नगरमधील जुन्या झोपड्या हटविण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. सदर नवी मुंबई महानगरपालिकेच्या विस्तारित कचराभूमीच्या काही पाच ते सहा हेक्टर जागेवर गेली 40 वर्षे वास्तव्य असलेल्या तुर्भे येथील सुमारे दहा हजार स्थानिक रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. परंतु सन 1995 पूर्वीच्या झोपड्या असल्यामुळे शासकीय धोरणानुसार सदर घरे हि संरक्षणास पात्र होत आहेत. तरी तुर्भे येथील हनुमान नगर वासियांना स्थलांतरित न करता घनकचरा व्यवस्थापनाकरिता देण्यात आलेले सर्व्हे नं. 376,377,378,379 या जमिनीवर ताबा न देता इतरत्र ठिकाणी देण्यात यावा अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांजकडे केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदर झोपडपट्टी धारकांकरिता पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकास योजना लवकरात लवकर राबविल्या जातील  व सदर हनुमान नगर झोपडपट्टी धारकांवर हात लावला जाणार नाही तसेच हनुमान नगर झोपडपट्टी सोडून 34 एकर स्वतंत्र जागा महापालिकेला देण्यात येईल असे सूचित केले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.