हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या

देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारला आव्हान

नवी मुंबई : ‘हिंमत असेल तर जनादेश तपासा आणि पुन्हा निवडणूक लावा’, असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. नवी मुंबईत भाजपकडून आयोजीत करण्यात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली. तसेच तिन्ही पक्षांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पक्ष समर्थ असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

नवी मुंबईत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिलाय, तो विचार शिवसेना विसरली असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच आम्हाला सरकार पडण्याची गरज नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा. असेल हिम्मत तर या एकत्र अंगावर, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरुन उरु असं थेट आव्हान फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलेंआहे. तसेच हिम्मत असेल तर सावरकरांची बदनामी करणार्‍याच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचे कबूल करा, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दोन दिवसीय अधिवेशनातील तासाभराच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या एसआयटीमार्फत तपास करा या मागणीवरही त्यांनी टीका केली आहे.

भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित होते.


महाविकासआघाडीच्या नेत्यांची टीका

देवेंद्र फडणवीस यांच्या हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या या वक्तव्यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. सरकार पडणार नाही, आम्ही पाच वर्षे चांगलं काम करू असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तर फडणवीस यांनी जपून बोलावं, एक एक जण या, बघून घ्यायला हा काही कुस्तीचा आखाडा नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे.

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं. सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे. महाविकासआघाडी सरकारचं काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.

दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ’विरोधी पक्षनेत्यांचे ’हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा’ विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलणार्‍यांना पुन्हा निवडणूक परवडणार नाही, ही जाणीव नाही. निवडणूक हा खेळ वाटला का? अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहे’, असं ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.