मोरा ते मुंबई जलवाहतूक सुरू

उरण : कोरोनाकाळात गेली साडेपाच महिने बंद असलेली उरण (मोरा) ते मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यान असलेली प्रवासी जलवाहतूक गत गुरुवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मात्र सुरक्षित अंतराचे, सर्व नियमांचे पालन करून हा प्रवास करावा लागणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने रस्ते वाहतुकीसह हवाई व जलवाहतूकही बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यापासून राज्य सरकारने ‘पुन्हा सुरुवात’ याअंतर्गत हळूहळू वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. मोरा ते मुंबई दरम्यानचा जलप्रवास हा उरणमधील तसेच मुंबईतून उरणमध्ये येणार्‍यांसाठी एक सुखद प्रवास असतो. या सेवेचा हजारो प्रवासी लाभ घेत होते. ही सेवा सुरू करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली ही सेवा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने पुन्हा एकदा सुरू केल्याने मुंबईत जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोट

गुरुवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना याची माहिती नाही. त्यामुळे प्रवासी संख्या कमी असली तरी यात वाढ होईल. सर्व नियम पाळूनच ही सेवा सुरू राहणार आहे.

- प्रभाकर पवार, मोरा बंदर अधिकारी