देशात कोरोना रि-इन्फेक्शनची 3 प्रकरणे

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र जवळपास 62 लाख लोक कोरोनामुक्त झाले ही दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) महासंचालकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची 3 प्रकरणांची नोंद झाली आहे.

पुन्हा कोरोनाची लागण झालेल्या तीन रुग्णांमध्ये मुंबईतील 2 प्रकरणे आहेत, तर अहमदाबादमध्ये एका रुग्णाला दुसर्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. आयसीएमआरच्या संचालकांनी सांगितलं की, डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार जगात आतापर्यंत कोरोना रि-इन्फेक्शनची एकूण 24 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र डब्ल्यूएचओला अद्याप हे माहित नाही की कोरोनाचं पुन्हा संक्रमण 100 दिवसानंतर झालं की 90 दिवसांनंतर झालं. डब्लूएचओ सध्या हा कालावधी 100 दिवस मानत आहेत.

भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. दररोज रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे, देशात रुग्ण बरे होण्याचा दरातही सुधारणा झाली आहे. सध्या हा दर 86.78% इतका आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने घट होत आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकून पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत 11.69%इतकी म्हणजे 8,38,729 इतकी आहे. आज सलग पाचव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी आहे.