Breaking News
माहिती व तंत्रज्ञानाचा अनुभव नसलेल्या अधिकार्यांची निवड समितीवर वर्णी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने 150 कोटी रुपये खर्च करुन शहरात सीसीटीव्ही लावण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प बनविण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराची निवड प्रक्रिया वादात सापडली आहे. सल्लागार निवड समितीवरील अधिकारी हे माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संबंधित नसतानाही त्यांची वर्णी तत्कालीन आयुक्त व शहर अभियंता विभागाने कोणत्या निकषाच्या आधारे लावली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्यात माहिती तंत्रज्ञानाशी संलग्न कोणतेही प्रकल्प राबविताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचे पॅनल तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेतून शासनाने सहा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ कपंन्यांची निवड केली होती. त्यामध्ये मे. डिलॉईट, मे. अर्नस्ट अॅण्ड यंग, मेे. ग्रॅन्ड थॉर्नटॉर्न, मे. केपीएमजी, मे पीडब्लयुसी व मे. विप्रो यांचा समावेश होता. राज्यातील कोणत्याही शासकीय संस्थांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्प राबविण्याचे ठरवल्यास वरील पॅनलवरील तज्ज्ञ सल्लागारांची नेमणुक करण्याचे धोरण सरकारने सर्व महापालिकांना कळवले होते. नवी मुुंबई महानगरपालिकेने 21 जून 2021 रोजी वरील सहाही सल्लागार कंपन्यांना पत्र पाठवून पालिका आयओटी-आयसीटी स्मार्ट सोल्यूशन आणि तंत्रज्ञानांतर्गत प्रेझेंटेशन देण्यास सांगितले होते. या प्रेझेंटेशन सादर करणार्या कंपन्यांना पीपीटी अंतर्गत तपशील 20 गुण, रोडमॅप 15, तांत्रिक मनुष्यबळ 25, कंपनीचा मागील अनुभव 20 आणि महापालिकेशी संबंध 20 गुण देण्यात येणार होते. हे गुण देण्यासाठी पालिकेने नेमलेल्या समितीमध्ये शहर अभियंता, उपायुक्त प्रशासन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि विद्युत अभियंता यांचा समावेश करण्यात आला होता. पालिकेेने सल्लागार निवड समितीवर नेमलेल्या एकाही अधिकार्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचे ज्ञान नसताना मंत्रालयातील नाथांच्या दबावाने वशिष्ट सल्लागार नेमण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही प्रकल्पाच्या सल्लागाराच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी होवू लागली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai