नियोजनाअभावी नवी मुंबई शहराचे भवितव्य धोक्यात!
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2026
- 114
पुनर्विकास, आरोग्य, शैक्षणिक स्थिती, वाढते प्रदुषण यावर परिसंवादामध्ये वक्त्यांनी मांडले परखड मत
नवी मुंबई ः पत्रकार दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट या संस्थांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील पुनर्विकास, नियोजन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा लोकशाहीचा जागर हा कार्यक्रम नुकताच वाशीत पार पडला. या परिसंवादात शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपक्रमाच्या जागा, सांस्कृतिक संस्था, महिला सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या मुद्यांवर स्पष्ट आणि परखड मते वक्त्यांनी मांडली. त्याचबरोबर उपस्थित जागरुक नागरिकांनी चर्चेत सहभाग घेत प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून शहराच्या दृष्टीने असलेल्या धोरणात्मक अपेक्षा व्यक्त केल्या.
आरोग्याच्या बाबतीत नवी मुंबई शहर ज्वालामुखीवर असलेले शहर झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय यांच्याशी पालिकेने समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण याकडे लक्ष देण्याची गरज डॉ. संजय पत्तीवार यांंनी व्यक्त केली. वाढत चाललेले प्रदुषण हा गंभीर मुद्दा असून यामुळे माणसाची जगण्याची क्षमता 6 वर्षांनी कमी झाल्याची जाणीव त्यांनी करुन दिली. जनप्रतिनिधींनी याचाही गांर्भीयाने विचार करुन सर्वसमावेशक नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्यातील समन्वयाच्या अभावावरही यावेळी टीका झाली. दोन शासकीय यंत्रणांमधील वादांचा फटका सामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना बसत असल्याचे बीएएनएमचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी यावेळी म्हणाले. अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे अनेक चांगले प्रकल्प अडकून पडत असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली. नवी मुंबईच्या भौगोलिक विकासाच्या अनुषंगाने नैना प्रकल्पासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये योग्य नियोजनासह बेंचमार्क तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महिला सुरक्षेबाबत नवी मुंबईतील स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत शहरात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबाबत प्रा. वृषाली मगदूम यांनी चिंता व्यक्त केली. शासनाच्या आरोग्य विषयी योजनेचा रुग्णालयातून लाभ मिळत नाही. किंबहुना या योजना अस्तित्वात आहेत हेच तेथील प्रमुखांना माहित नसल्याचे वास्तव त्यांनी मांडले. याबाबत जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनजागृती करणे आणि त्यांना सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या मुद्यावर राईट टू एज्यूकेशन (आरटीई) अंतर्गत 25 टक्के प्रवेश सातवीपर्यंतच मर्यादित राहणे ही मोठी अडचण विद्यार्थ्यांसाठी झाली आहे. जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ही मर्यादा 10 वी पर्यंत वाढवणे गरजेचे आहे. शिक्षण विभागामार्फत योग्य ती अंमलबजावणीसाठी शाळांना भाग पाडणे गरजेचे असल्याची जाणीव मगदूम यांनी नव्याने येण़ाऱ्या लोकप्रतिनिधींना केली आहे.
महापालिकेच्या विकास आराखडात शहरात जागेची कमतरता असल्याने व्हर्टिकल विकास हाच एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले आहे ते चुकीचे असल्याचे सांगत कालांतराने ज्या समस्या मुंबईत निर्माण झाल्या होत्या आणि त्याच समस्या आज नवी मुंबईत निर्माण होत असल्याचे जाणीव सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी नव्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींना करुन दिली. लोकप्रतिनिधींनी याबाबत साधक-बाधक विचार करुन शहराचे आरोग्य न बिघडता विकासाचा मार्ग कसा स्विकारता येईल याबाबत तज्ञ लोकांचा सहभाग करुन घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केली आहे. पुनर्विकासासाठी आधी प्लॅनिग करणे अत्यावश्यक आहे. फक्त इमारती वाढत चालल्या आहेत मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधांचा विचार केला जात नाही. शहर चकाचक, स्मार्ट करण्याच्या नादात आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात टाकू नये हे लोकप्रतिनिधींनी समजून घेतले पाहिजे. होल्डिंग पॉण्ड्समधील गाळ व खारफुटी काढण्यासाठी पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लोकप्रतिनिधींनी न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडल्यास हा प्रश्न मार्गी लागण्याचे सूतोवाच पर्यावरण तज्ञ डॉ. मोहन डगांवकर यांनी केले. शहराचे नियोजन हे विशिष्ट लोकसंख्या नजरेसमोर ठेवून सिडकोने केले होते. सिडकोने गृहित धरलेली लोकसंख्या कधीच पार झाली असून त्यामुळे पुनर्विकास करताना केवळ इमारतींचा विचार न करता रस्त्यांची रुंदी, सार्वजनिक पार्किंग व सांडपाणी व्यवस्था याबाबत मास्टर फ्लॅन बनवून पुर्नविकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळीच याची दखल घेऊन त्याबाबत सर्वसहमतीने महापालिकेचे धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन यातून सुवर्णमध्य साधतील अशी अपेक्षा यावेळी संजय सुर्वे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर फोफावलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी क्षेत्रिय समित्या स्थापन करुन नागरी कामांवर लक्ष ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले.
शहरात वाचन संस्कृती, कला, नाटक, साहित्य आणि स्थानिक उत्सवांमधून नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निश्चित धोरण आखणे गरजेचे असल्याचे मराठी साहित्य-संस्कृति मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai