बेलापुर मतदारसंघात कोणाचा करिष्मा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2026
- 125
अनुभवी उमेदवारांचे तगडे आव्हान
सध्या बेलापुर मतदारसंघात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत. या मतदारसंघात सध्याच्या पॅनल पद्धतीनुसार 15 ते 28 प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र पाहायला मिळतअसले तरी येथे नवी मुंबईकर भाजपला झुकते माप देताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत भाजपच्या सहा पैकी 5 नगरसेवक हे बेलापुर मतदार संघातील होते. नुकत्याच झालेल्या जागावाटपाबाबत जरी कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग 15 ते प्रभाग 28 या प्रभागात अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांत जोरदार लढत पाहायला मिळत असली तरी या मतदारसंघातून 40-45 भाजपच्या उमेदवारांना नवी मुंबईकरांची पसंती मिळेल असे सध्याचे चित्र बेलापुर मतदार संघात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा शिवसेनेला कितपत फायदा देतो यावर सेनेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
प्रभाग क्र. 15 - 36137 मतदार असलेल्या प्रभाग क्र. 15 मधून 19 उमेदवार उभे असून 3 अपक्ष नशीब आजमावत आहेत. अ मध्ये भाजपच्या शुभांगी पाटील यांच्या विरुद्ध शिवसेनेचे विलास भोईर तर ब मध्ये भाजपच्या शशिकला पाटील यांची शिवसेनेच्या उषा विलास भोईर यांच्याशी लढत होणार आहे. क मधून भाजपच्या उषा पुरुषोत्तम भोईर व शिवसेनेच्या कविता पाटील उभ्या आहेत. ड मध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांच्यात तगडी लढत होणार आहे. या लढतीकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागलेआहे. या प्रभागात डि.आर.पाटील यांचे संपुर्ण कुंटुंब नशीब आजमावत असल्याने त्यांच्या खेळीवर त्यांच्या विरोधी उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे येथे शिंदे व नाईकांना समसमान यश मिळेल असे सध्याचे चित्र आहे.
प्रभाग क्र. 16 - मध्ये 35735 मतदार असून 3 अपक्षांसह एकुण 17 उमेदवार उभे आहेत. येथे शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात थेट लढत होतअसली तरी भाजपच्या या पॅनलमध्ये माजी महापौर अंजनी भोईर, अंजली वाळुंज, शशिकांत राऊत तर प्रकाश मेोरे हे मातब्बर माजी नगरसेवक उभे आहेत. यांच्यासमोर शिंदेसेनेने सचिन नाईक, काजल भणगे, प्राजक्ता मोंडकर आणि दर्शन भणगे यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान उभे केले असले तरी या प्रभागात भाजपला पुर्णतः यश मिळेल अशी सध्याची परिस्थिती आहे.
प्रभाग क्र. 17 - 35,392 मतदार असलेल्या प्रभाग क्र. 17 मध्ये 2 अपक्षांसह 15 उमेदवार उभे आहेत. या प्रभागातून किशोर पाटकर, माजी नगरसेवक अविनाश लाड यांची पत्नी प्रणाली लाड व मुलगी सोनवी लाड तसेच माजी नगरसेविका दिव्या गायकवाड उभ्या आहेत. सुरुवातीलाच अ गटातून भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज अवैध ठरवला होता. मात्र शुक्रवारी ते पात्र असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याने आता भाजप आणि शिवसेनेत तगडी लढत असणार आहे. तसेच उबाठातून भाजपात गेलेले विठ्ठल मोरे यांचे पुत्र अवधूत मोरे ड गटात आपले नशीब आजमावत आहेत. पॅनलमधील चारही शिंदेसेनेच्या उमेदवारांचा जनसंपर्क दांडगा असल्याने येथे शिंदे यांना यश अपेक्षित आहे.
प्रभाग 18 मध्ये 29349 मतदार असून 4 अपक्षांसह 14 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. येथे शिवसेना व भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. येथे भाजपचे अनिल कौशिक इच्छुक होते परंतु त्यांना तिकीट मिळाले नसल्याने ते नाराज असले तरी त्याचा म्हणावा तसा प्रभाव येथे पडणार नसल्याची चर्चा आहे. या प्रभागात भाजपने माजी नगरसेवक दशरथ भगत, द्यावती शेवाळे, माजी नगरसेविका रुपाली भगत यांचे पती निशांत भगत व प्रिती भगत यांना उमेदवारी दिली आहे. तीनही गटातील उमेदवार हे तगडे असल्याने येथे भाजपला यश अपेक्षित आहे. शिवसेनेकडून श्रीकांत हिंदळकर हा ओळखीचा चेहरा जरी दिला असला तरी त्यांचा कितपत निभाव लागेल याबाबत साशंकता आहे.
प्रभाग 19 - 29280 मतदार असलेल्या प्रभाग 19 मध्ये 22 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 8 अपक्षांचा समावेश आहे. शिवसेनेकडून अ गटात सोमनाथ वास्कर तर ब मध्ये कोमल वास्कर उभ्या आहेत. क मध्ये नेहा वास्कर तर ड मध्ये अविनाश जाधव शिवसेनेकडून नशीब आजमावत आहेत. यामध्ये सोमनाथ वास्कर आणि कोमल वास्कर यांची स्थिती मजबूत असून भाजपच्या शिल्पा ठाकूर आणि सुनिल कुरकुटे यांची स्थिती भाजपतील बंडखोर पांडुरंग आमले व त्यांच्या पत्नी शारदा आमले यांमुळे कमकूवत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदार कोणाला बाण मारतात आणि कोणाला फुल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या प्रभागात तुर्ततरी शिवसेनेला यश अपेक्षित असले तरी भाजपही दोन जागांची अपेक्षा ठेवून आहे.
प्रभाग क्र. 20 मध्ये 34575 मतदार असून 3 अपक्षांसह 23 उमेदवार उभे आहेत. यामध्ये माजी सभापती सुरेश कुलकर्णी व अमित मेढकर यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळत आहेत. भाजपने येथे सुजाता शिंदे, सुजाता मेढकर, अंकुश मेढकर व अमित मेढकर यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक चंद्रकांत आगोंडे तसेच सुरेश कुलकर्णी यांच्या स्नुषा अबोली कुलकर्णी नशीब आजमावत आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे माजी नगरसेविका संगिता सुतार, उबाठाचे महेश कोठीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवशरण पुजारी उभे असून त्यांना मिळणारी मते ही दिग्गजांचा विजय व पराजय निश्चित करणारी आहेत. त्यामुळे या प्रभागात चारही लढती अतिशय चुरशीच्या असून सध्या तरी शिंदे व नाईकांना समसमान संधी असल्याचे बोलले जाते.
प्रभाग क्र. 21 मध्ये 38,383 मतदार असून 5 अपक्षांसह 19 उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. या प्रभागात भाजपकडून माजी महापौर जयवंत सुतार, त्यांच्या स्नुषा माधुरी सुतार, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी व नगरसेविका मिरा पाटील उभ्या आहेत. हे चारही उमेदवार तगडे असून त्यांच्यासमोर शिवसेनेचे चंद्रकांत आगोंडे यांची मुलगी कविता आगोंडे व काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी उभे आहेत. प्रभाग क्र. 21 मध्ये भाजपचे पारडे जड दिसत असून त्यांना यशाची खात्री वाटत आहे.
प्रभाग क्र. 22- 33,057 मतदार असलेल्या प्रभाग क्र. 22 मध्ये विविध पक्षांतर्फे 18 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून विजय साळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांची पुतणी डॉ. प्रणाली पाटील व भाऊ काशिनाथ पाटील तसेच उषा यमगर उभे आहेत. यामध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले रविंद्र सावंत विरुद्ध विजय साळे, तसेच काशिनाथ पाटील विरुद्ध रंगनाथ औटी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. उषा यमगर यांच्याविरोधात भाजपच्या सुहासिनी नायडू यांनी बंडखोरी केली असल्याने व त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्याचा फटका अधिकृत उमेदवाराला बसून सेनेच्या शशिकला औटी यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी शिंदे व नाईक यांच्यामध्ये समसमान लढाई पाहायला मिळत असली तरी सुहासिनी नायडू यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरुन भाजपच्या यशाची निश्चिती होईल.
प्रभाग क्र. 23 मध्ये 39,201 मतदार असून 2 अपक्षांसह 20 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये शिवसेना व भाजप यांनी तगडे उमेदवार उभे केल्याने चारही गटात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून सुरज पाटील व त्यांची पत्नी सुजाता पाटील तसेच माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत व प्रदिप गवस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेविका सुनिता मांडवे, माजी नगरसेवक दिलीप घोडेकर, माजी नगरसेवक विजय माने यांची मुलगी अश्विनी माने तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महादेव पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अश्विनी माने यांच्या विरोधात उबाठाच्या रोहिणी शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री तिडके उभ्या असल्याने त्याचा फटका शिंदे सेनेला बसण्याची शक्यता आहे. तसेच दिलीप घोडेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविण खेडकर उभे आहेत. या चारही लढती तुल्यबळ असल्या तरी भाजपला 100 टक्के यशाची खात्री असली तरी शिवसेनेच्यावतीने 2 उमेदवारांचा विजय निश्चित मानत आहेत.
प्रभाग क्र. 24 मध्ये 39,349 मतदार असून 4 अपक्षांसह 22 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्यावतीने माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, स्वप्ना गावडे तसेच प्रिती भोपी व सचिन लवटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक नामदेव भगत व इंदुमती भगत तसेच देवकी शिंदे व काशिनाथ पवार आपले नशीब आजमावत आहेत. नामदेव भगत व गिरीश म्हात्रे तसेच स्वप्ना गावडे व इंदुमती भगत यांच्यात लढत असून गट अ मध्ये उबाठाचे सतीश रामाणे उभे आहेत. रामाणे यांचा फटका नामदेव भगत यांना बसण्याची शक्यता आहे. स्वप्ना गावडे यांच्या विरोधात त्यांच्याच सोसायटीतील भाजप बंडखोर मंगल घरत उभ्या आहेत. त्याचाही फटका गावडे यांना बसण्याचीशक्यता आहे. प्रभागात झालेल्या बंडखोरीमुळे सध्या तरी शिवसेना व भाजपमध्ये समसमान लढत पाहायला मिळत आहेत.
प्रभाग क्र. 25- 34226 मतदार असलेल्या प्रभाग क्र. 25 मध्ये 3 अपक्षांसह 24 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. या प्रभागात माजी नगरसेवक सुनिल पाटील, रविंद्र इथापे व नगरसेविका सलुजा सुतार व नेत्रा शिर्के भाजपकडून उभे आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून महेंद्र नाईक, हिरामण निरभवने, सितारा बानू आणि ॲड सुजाता गुरव यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला असला तरी ते या दिग्गजांपुढे कितपत टिकाव धरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रभाग क्र. 25 मध्ये भाजपचे 100 टक्के यश गृहित धरले जात असले तरी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा करिष्मा शिवसेनेच्या उमेदवारांना कितपत लाभ देतो याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्र, 26 मध्ये 37846 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून या प्रभागात 3 अपक्षांसह 20 उमेदवार उभे आहेत. भाजपतर्फे माजी नगरसेवक दिपक पवार, विशाल डोळस तसेच माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या पत्नी रेखा म्हात्रे उभ्या असून ब मधून संतोषी म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून भाजपात बंडखोरी केलेले दत्तात्रय घंगाळे व अश्विनी घंगाळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली असून त्याचा फटका दिपक पवार व संतोषी म्हात्रे यांना बसण्याची शक्यता आहे. या प्रभागात शिवसेना व भाजप यांच्यात समसमान लढत असून घंगाळे यांच्या बंडखोरीला भाजप मतदार किती प्रतिसाद देतात यावर शिवसेनेचे यश अवलंबून आहे.
प्रभाग क्र 27 मध्ये 31750 मतदार असून 13 उमेदवार विविध पक्षांतर्फे आपले नशीब आजमावत आहेत. या प्रभागात भाजप-शिवसेना यांच्यात लढत होणार असली तरी येथे मात्र शिवसेनेचा जोर दिसत आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी, सरोज पाटील तसेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेविका पुनम पाटील, व अमित पाटील यांच्यामुळे या प्रभागात शिवसेनेचे 100 टक्के यश गृहित धरले जात आहे. भाजपकडून तेजश्री म्हात्रे, ज्योती पाटील, संजय कोळी आणि प्रमोद जोशी यांनी अर्ज भरला आहे. गणेश नाईक व स्थानिक आमदार मंदा म्हात्रे या प्रभागात किती मेहनत घेतात यावर भाजपचे यश अवलंबून आहे.
प्रभाग क्र. 28 मध्ये 26,125 मतदार असून 7 अपक्षांसह 22 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या तीनही गटात आपले माजी नगरसेवक जयाजी नाथ, नगरसेविका सुरेखा नगरबागे व स्वाती गुरखे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्यावतीने वंदना शिंदे व जसपाल सिंग आपले नशीब आजमावत असून ब गटात शरद पवार गटाच्या अस्मिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयाजी नाथ यांच्या विरुद्ध भाजप बंडखोर सि.व्ही. रेड्डी उभे असून ते किती मते घेतात यावर जयाजी नाथ यांचा विजय निश्चित होणार आहे. जरी या प्रभागात भाजप बंडखोर उभा असला तरी येथे भाजपचे 100 टक्के यश गृहित धरले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai