सोमवार, शुक्रवारी सुट्टी घेण्यास मनाई

पनवेल पालिका आयुक्तांचे अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी परिपत्रक

पनवेल : सरकारी कामकाजासाठी राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून 29 फेब्रुवारीपासून याची अमंलबजावणी होणार आहे. पनवेल महापालिकेनेही त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सलग सुट्ट्यांमुळे शासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नव्याने परिपत्रक काढत सोमवार व शुक्रवारी अधिकारी, कर्मचार्‍यांना सुट्टी घेण्यास मनाई केली आहे.

पाच दिवसांचा आठवडा केल्याने शासकीय अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना शनिवार, रविवार अशी दोन दिवसांची सलग सुट्टी मिळणार आहे. राज्यभरातील शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेने पाच दिवसांच्या आठवड्याचे काटेकोर पालन व्हावे, तसेच पालिकेत येणार्‍या नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, याकरिता अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना सहजरीत्या मिळणार्‍या सुट्टीवर सोमवार व शुक्रवारी बंदी घातली आहे. शनिवार, रविवार या दोन सुट्ट्यासोबत काही कर्मचारी अथवा अधिकारी अतिरिक्त सुट्टी घेऊन सरसकट तीन दिवस सुट्ट्यांचा बेत करू शकतात, त्यामुळे याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. पनवेल महानगरपालिकेत अद्यापही कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे सलग दोन सुट्ट्यांचा फायदा घेत अतिरिक्त एक दिवसाची रजा वाढविल्यास त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता असल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी ही संकल्पना पनवेल महानगरपालिकेत राबविली आहे. पनवेल महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांच्या व त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी सुधारित वेळ राहणार आहे. सर्व कार्यालयातील शिपाई कर्मचार्‍यांसाठी सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी राहणार आहे. दुपारी 1.30 ते 2 अशी एकूण 30 मिनिटे भोजनाची सुट्टी राहणार आहे.