अनैतिक देहव्यवसायाचा पर्दाफाश
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 54
पनवेल ः तळोजा एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायाचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करत अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सात पीडित महिलांची सुटका केली आहे. 21 डिसेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या या कारवाईनंतर 22 डिसेंबरला तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाने औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि मानवी तस्करीच्या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या देहव्यवसायाविषयी नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती. तळोजा एमआयडीसीतील ‘नवनाथ इन’ या लॉजमध्ये हा गैरप्रकार सुरू असल्याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त पद्धतीने पडताळणी केली. तपासादरम्यान लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांना महिलांची निवड करून दिली जात असल्याचे आणि त्यासाठी दोन हजार रुपये आकारले जात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. 21 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी सांकेतिक इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. या कारवाईत एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी आणि सहा प्रौढ महिलांना वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि कर्मचारी रोशन रामजित यादव यांनी संगनमताने महिलांना लॉजमध्ये ठेवून देहव्यवसाय चालविल्याचे स्पष्ट झाले. या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 डिसेंबर रोजी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास तळोजा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारचे गैरप्रकार घडत असल्याने स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai