पनवेलमध्ये मविआ एकत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 57
मतभेद बाजूला ठेवत भाजपविरोधी एकसंघ लढत
उरण ः पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व महायुती विरोधात सर्वपक्ष एकत्र आले असून महाविकास आघाडी ही निवडणुक एकत्र लढवणार आहे. घटकपक्षांतील मतभेद बाजूला ठेवत एकसंघ लढत देण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी आघाडीतील प्रमुख पक्षांनी तडजोडीची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. मविआची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शेकाप 38-40, ठाकरेसेना 15-18, राष्ट्रवादी काँ. (शरद पवार गट) 6-8 व मनसे 5-8 असा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
महापालिका निवडणुकांचा धुरळा सुरु असून प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागला आहे. युती, आघाडी याच्यासाठी चर्चेच गुऱ्हाळ सुरु असून काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वःबळाचा नारा पाहायला मिळत आहे. पनवेल महापालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर आघाडीतील सर्वात मोठा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) त्यागाची भूमिका घेतली. मागील 2017 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा यंदा तब्बल 18 जागा कमी ठेवत शेकापने 38 जागांवर उमेदवार देण्यास होकार दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उर्वरित 40 जागांचे वाटप ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन चळवळीतील सहकारी पक्ष, समाजवादी पक्ष तसेच खारघर फोरम व कळंबोलीतील विकास आघाडी यांच्यात करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एकच सर्वमान्य उमेदवार देण्यावर आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. प्रत्येक प्रभागातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी इच्छुकांची मनजुळवणी, संवाद आणि समन्वयाचा मार्ग स्वीकारण्यात येत असल्याचे आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. हा त्याग सत्तेसाठी नव्हे, तर एकसंघपणे जिंकण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार आहोत. गेल्या 8-10 दिवसांच्या चर्चेनंतर आम्ही शेवटच्या टप्पात आलो आहोत. लढू आणि जिंकू, या तत्त्वावर आधारित ही रणनिती पनवेलमध्ये महाविकास आघाडी करणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
यंदा कोणाची बाजी?
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 20 प्रभागांत 78 जागांसाठी मतदान होणार आहे. पनवेल महापालिकेची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पाच लाख 54 हजार 578 मतदार आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात पाच लाख 54 हजार 578 मतदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून पुन्हा बहुसंख्य सदस्य रचना करण्याचे ठरले. या निवडणुकीत पनवेल महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील एकूण 78 नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडतीनुसार, सहा जागा अनुसूचित जातींसाठी, त्यापैकी तीन जागा अनुसूचित जात महिला उमेदवारांसाठी, तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागांपैकी एक जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी देखील मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीनंतर पनवेल परिसरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे.
- 194 नामनिर्देशन पत्र विक्री
नामनिर्देशन पत्र विक्रीच्या पहिल्या दिवशी एकुण 233 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली होती. तर 24 डिसेंबर नामनिर्देशन पत्र विक्रीच्या दुसऱ्या दिवशी एकुण 194 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 30 डिसेंबर पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. प्रभाग 1,2 आणि 3 रोजी एकूण 55, प्रभाग 4,5,6 येथे एकूण 23 , प्रभाग 7,8,9,10 येथे एकूण 37 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली. प्रभाग 11,12,13 येथे एकूण 45, प्रभाग 14,15,16 येथे एकूण 18, प्रभाग 17,18,19,20 येथे एकूण 16 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली. एकूणच आज सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 194 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली. तर नामनिर्देशन पत्र प्राप्त संख्या शून्य आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai