नागरी सेवा आता सिडको मुख्य दक्षता अधिकार्‍यांच्या कार्यकक्षेत

नवी मुंबई ः सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या निर्देशानुसार सिडकोच्या इतिहासात प्रथमतःच नवी मुंबईतील नागरी सेवा आता सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी शशिकांत महावरकर यांच्या कार्यकक्षेअंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका यांच्याशी आवश्यक तो समन्वय साधून नवी मुंबईतील नागरी सेवेसंदर्भातील प्रश्‍न सोडवण्यात येणार आहेत.

नागरी सेवेसंदर्भातील सर्व प्रश्‍न मुख्य दक्षता अधिकारी म्हणजेच आयपीएस कॅडरच्या अधिकार्‍याच्या कार्यकक्षेत आल्यामुळे आता नवी मुंबईतील सर्व प्रकारच्या नागरी सेवांसंदर्भातील प्रश्‍नांवर विशेष लक्ष देणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांच्या नागरी सेवेसंदर्भातील समस्यांवर आणखीन जलद गतीने व सुलभतेने उपाययोजना करणे शक्य होणार आहे. या सर्व प्रक्रीयेमध्ये सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी हे नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून नागरी सेवांमध्ये आणखी उत्कृष्टता आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.