हिंद टर्मिनल कंपनी वठणीवर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2022
- 791
उरण ः एप्रिल महिन्यात कंपनीचा करार संपुष्टात येणार असल्याने भेंडखळ येथील हिंद टर्मिनल कंपनी बंद करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे सुमारे 500 कामगारांच्या नोकरीचा व पुढील भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कंपनीने कामगारांना कुठल्याही प्रकारची कायदेशीर देणी, नुकसान भरपाई व नोकरीची हमी न देता कंपनीतील कलमार मशीन व इतर सामग्री बाहेर काढण्याचा व्यवस्थापनाने सुरू केलेला प्रयत्न संतप्त कामगार, कामगार संघटना, ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय पुढार्यांनी हाणून पाडला.
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत क्षेत्रात 15 वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनीवर हिंद टर्मिनल कंपनीने कंटेनर हाताळणीच्या कामासाठी गोदामाची उभारणी केली आहे. गोदामात विविध प्रकारच्या ठेकेदाराच्या कामात 502 स्थानिक कामगार काम करीत आहेत. हिंद टर्मिनलने आता कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल 2022 नंतर कंपनी बंद करण्याची नोटीसही कामगार व संघटनांना दिली आहे. कंपनी बंद पडल्यास पाच हजार स्थानिकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे. हिंद टर्मिनल कंपनीकडून कामगारांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय समितीच्या माध्यमातून आणि कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेटवरच आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने कामगार, कामगार संघटनांना अंधारात ठेवून कंपनीतून मशिनरी आणि इतर साधनसामग्री गेटबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याची कुणकुण लागताच कामगार, कामगार संघटना, सर्वपक्षीय नेत्यांनी प्रवेशद्वारावर एकत्रितपणे जमून कंपनीतून मशिनरी आणि इतर साधनसामग्री गेटबाहेर काढण्यास अटकाव केला. कामगारांच्या हक्काची कायदेशीर देणी मोबदला, तसेच नुकसानभरपाई दिल्याशिवाय कंपनीतून एकही मशिनरी बाहेर जाऊ दिली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी कामगार नेते महेंद्र घरत व भूषण पाटील, चारही कामगार संघटनेचे, विविध राजकीय पक्षांचे नेते, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन विभागीय महाव्यवस्थापक सुरेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai