बांगलादेशीकडे सापडले बनावट शासकीय दाखले

पनवेल : तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बांगलादेशी नागरिकाला चिखले येथून अटक केली होती. पोलिसांना त्याच्याकडे बोगस नावाने रेशन कार्ड, लायसन्स, आधार कार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रे सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. 

सामान्य माणसाला शासकीय दाखले किंवा रेशन कार्ड बनवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अनेकदा पायर्‍या झिजवाव्या लागतात. दाखले बनवण्यासाठी महिना महिना फेजया माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून पनवेलमध्ये राहत असलेल्या या नागरिकांना काही पैसे मोजून सहज शासकीय दाखले उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. चिखले गावातून तालुका पोलिसांनी एका बांगलादेशीला 23 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. इनामूल उमर मुल्ला (फरीदपूर, बांगलादेश) असे याचे खरे नाव असून, तो मनोहर पवार (चिखले) या खोट्या नावाने वास्तव्य करत होता. त्याच्याकडे बनावट नावाचे शासकीय दाखले आढळल्याने पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतात राहणार्‍या नागरिकांकडे जेवढी कागदपत्रे नसतील, त्यापेक्षा अधिक शासकीय दाखले बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या या बांगलादेशी नागरिकांकडे सापडले आहेत. हे दाखले कसे, कोठून आणि कुणाकडून मिळवलेत, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. इनामूल हा मनोहर राहू पवार हे नाव धारण करून चिखले येथे राहत होता. त्याला मराठी भाषा येत असल्याने गावात त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळे त्याचे गावातील एका मुलीसोबत लग्नही लावून देण्यात आले असून, त्याला दोन अपत्य आहेत. इनामूल हा भारतातून बांगलादेशला चोरून जात असे. याच दरम्यान हा प्रकार उघडकीस आला व तालुका पोलिसांनी त्याला अटक केली. आणखी किती नागरिक बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर आले आहेत व किती जणांना असे बनावट कागदपत्र बनवून दिले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.